पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण
मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ-आरे भुयारी मेट्रो ३ मार्गिकेतील आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक ते कफ परेड असा शेवटचा टप्पा वाहतूक सेवेत दाखल होण्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. ३० सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या टप्प्याचे उद्घाटन होणार असल्याची घोषणा मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
मुंबई मेट्रो रेल कार्पोरेशनकडून (एमएमआरसी) ३३.५ किमीच्या भुयारी मेट्रो ३ मार्गिकेची उभारणी करण्यात आली आहे. या मार्गिकेतील आरे ते बीकेसी टप्पा ऑक्टोबर २०२४ मध्ये वाहतूक सेवेत दाखल झाला आहे. तर बीकेसी ते आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक टप्पा मे २०२५ मध्ये सुरु झाला आहे.
हे दोन टप्पे सुरु झाल्यानंतर आचार्य अत्रे चौक ते कफ परेड असा शेवटचा टप्पा केव्हा सुरु होणार, याची प्रतीक्षा मुंबईकरांना, प्रवाशांना होती. या टप्प्यासाठी याआधी एमएमआरसीकडून अनेक मुहूर्त देण्यात आले. मात्र तांत्रिक कारणांमुळे कामास विलंब झाल्याने मुहूर्त चुकले. पण आता मात्र शेवटच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून या टप्प्याची मेट्रो आयुक्त, मेट्रो रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून तपासणी अंतिम टप्प्यात आहे. आता केवळ सुरक्षा प्रमाणपत्र मिळण्याची प्रतीक्षा आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी मेट्रो ३ मार्गिकेतील शेवटचा टप्पा ३० सप्टेंबरला सुरु होणार असल्याचे जाहीर करीत मुंबईकरांना आनंदाची बातमी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० सप्टेंबरला मुंबईत येणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन पार पडणार आहे.
याच दिवशी मुंबईतील अन्य काही पायाभूत सुविधा प्रकल्पांचे लोकार्पणही होण्याची शक्यता आहे. त्यात मेट्रो ३ मार्गिकेतील आचार्य अत्रे चौक ते कफ परेड अशा शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणाचा समावेश असणार आहे. हा टप्पा वाहतूक सेवेत दाखल झाल्यास प्रवाशांना आरे ते कफ परेड असा थेट प्रवास करता येणार आहे. मेट्रो ३ मार्गिका पूर्ण क्षमतेने धावणार आहे. त्यामुळे ही बाब प्रवाशांसाठी दिलासा देणारी आहे.