मुंबई : म्हाडाच्या कोकण मंडळाने ४,६५४ (१४ भूखंडांसह) घरांसाठी काढलेल्या सोडतीच्या नोंदणी, अर्ज विक्री आणि स्वीकृती प्रक्रियेला अखेर काहीसा प्रतिसाद वाढला आहे. इच्छुकांना आकर्षित करण्यासाठी कोकण मंडळाने अर्ज विक्री – स्वीकृतीला मुदतवाढ दिली असून अर्ज भरण्यासाठीच्या नियमात काही बदल केले आहेत. याचा काहीसा फायदा आता मंडळाला होताना दिसत आहे. त्यामुळेच सोमवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत २१ हजार २७९ जणांनी अनामत रकमेसह अर्ज सादर केले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नव्या सोडत प्रक्रियेनुसार इच्छुकांना अर्ज भरतानाच आवश्यक ती कागदपत्रे जमा करावी लागत आहेत. सोडतीआधीच अर्जदारांची पात्रता निश्चिती कण्यात येत असून त्यानंतर पात्र अर्जदारांनाच सोडतीत सहभागी करून घेतले जाणार आहे. निवासाचा दाखला, आयकर विवरण पत्र, उत्पन्नाचा दाखला, जात पडताळणी प्रमाणपत्र आदी कागदपत्रे उपलब्ध करून देणे अनेकांना शक्य झालेले नाही. त्यामुळे अनेक इच्छुकांना अर्ज भरता आलेले नाहीत. परिणामी, यावेळी सोडतीला कमी प्रतिसाद मिळत आहे. कोकण मंडळाच्या काही हजार घरांना लाखात अर्ज येत असताना ४,६५४ (१४ भूखंड) घरांच्या सोडतीसाठी आतापर्यंत केवळ २१ हजार २७९ अर्ज सादर झाले आहेत.

हेही वाचा – शाह पेपर्स कंपनीवर ३५० कोटींच्या करचोरीचा आरोप, मुंबई, वापीमध्ये १८ ठिकाणी आयकर विभागाचे छापे

हेही वाचा – राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा गेला, आता घड्याळ चिन्हाचं काय? जयंत पाटील म्हणाले, “आमच्या पक्षाच्या…”

कोकण मंडळाने अर्ज भरण्यासाठी १९ एप्रिलपर्यंत, तर अनामत रक्कमेसह अर्ज जमा करण्यासाठी २१ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिल्याने आणि काही नियमात बदल केल्याने जमा अर्जांची संख्या २१ हजारांच्या पुढे जाऊ शकली आहे. अन्यथा २० हजारांचा टप्पाही गाठणे कोकण मंडळाला शक्य नव्हते. प्रस्तावित सोडत कार्यक्रमानुसार अर्ज भरण्याची मुदत १० एप्रिलपर्यंत होती. तर अनामत रक्कमेसह अर्ज जमा करण्याची मुदत १२ एप्रिल अशी आहे. पण आता मुदतवाढ दिल्याने सादर अर्जांची संख्या किमान ३० हजारचा टप्पा गाठू शकेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. अर्ज भरण्याचे नियम काहीसे शिथिल करण्यात आले असून, मंडळाने मुदतवाढही दिली आहे. परिणामी, सादर अर्जांची संख्या काहीशी वाढली आहे. मात्र अपेक्षेपेक्षा खूपच कमी प्रतिसाद आहे, असे कोकण मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mhada konkan lottery 2023 response increased after deadline extension and rule change mumbai print news ssb