मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या ५ हजार २८५ घरांसह ७७ भूखंडांसाठी ११ऑक्टोबरला सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारुप यादी मंडळाने बुधवारी रात्री प्रसिद्ध केली आहे. या यादीनुसार अनामत रक्कमेसह दाखल झालेल्या १ लाख ५८हजार ४२४ अर्जांपैकी १ लाख ५७ हजार २०७ अर्ज पात्र ठरले आहेत. तर १२१७ अर्ज अपात्र ठरले आहेत. विविध कारणांमुळे अपात्र ठरलेल्या अर्जदारांना आता शुक्रवारपर्यंत दावे आणि हरकती सादर करता येणार आहेत. दरम्यान, पात्र अर्जांपैकी ९० टक्क्यांहून अधिक म्हणजे १ लाख ४५ हजार ८०५ पात्र अर्जदार २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ५६५ घरांसाठी स्पर्धेत आहेत.
कोकण मंडळाने २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ५६५, एकात्मिक योजनेतील ३००२, म्हाडा योजनेतील १६७७, इतर योजनेतील ४१ घरांसह ७७ भूखंडांच्या सोडतीसाठी जुलैपासून सोडतपूर्व प्रक्रिया सुरू केली होती. मात्र या सोडतीला कमी प्रतिसाद मिळाल्याने दोन वेळा मुदतवाढ देण्यात आल्याने सोडतीची तारीख लांबणीवर पडली. त्यानंतर ९ ऑक्टोबर रोजी सोडत काढण्याचे मंडळाने जाहीर केली आणि २२ सप्टेंबर रोजी अर्जांची प्रारूप यादी जाहीर करण्याचा निर्णय घेतला. मात्र २२ सप्टेंबरची तारीख पुढे ढकलत ती ३० सप्टेंबर केली. मात्र अर्जांच्या छाननीचे काम पूर्ण न झाल्याने ३० सप्टेंबर रोजी अर्जांची प्रारुप यादी मंडळाला प्रसिद्ध करता आली नाही. त्यामुळे अर्जदारांमध्ये प्रचंड नाराजी होती. ही नाराजी पाहता छाननीचे काम प्राधान्याने पूर्ण करण्याचा निर्णय घेत १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी यादी जाहीर करण्याचे निश्चित करण्यात आले. मात्र ही यादी लांबणीवर पडल्याने सोडतीची तारीखही ९ ऑक्टोबरवरून ११ ऑक्टोबर करण्याची नामुष्की कोकण मंडळावर ओढावली. आता ११ ऑक्टोबर रोजी सोडत पार पडणार असून या सोडतीसाठी पात्र अर्जांची प्रारुप यादी बुधवारी रात्री प्रसिद्ध करण्यात आली. ५ हजार २८५ घरांसह ७७ भूखंडांसाठी अनामत रक्कमेसह १ लाख ५८ हजार ४२४ अर्ज दाखल झाले होत.
पात्र अर्जांच्या प्रारुप यादीनुसार प्राप्त अर्जांपैकी १२१७ अर्ज अपात्र ठरले असून १ लाख ५७ हजार २०७ अर्ज पात्र ठरले आहेत. त्यामुळे पात्र अर्जदार सोडतीत सहभागी होणार हे निश्चित झाले आहे. तर अपात्र १२१७ अर्जदारांना शुक्रवार, ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ पर्यंत दावे – हरकती सादर करता येणार आहेत. दावे – हरकतींचा विचार करून ९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता पात्र अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्यामुळे ९ ऑक्टोबर रोजी सोडतीत किती अर्जदार सहभागी होणार हे स्पष्ट होईल. तर सोडतीत नेमकी कोण बाजी मारणार हे ११ ऑक्टोबर रोजी समजेल. दरम्यान, या सोडतीतील म्हाडाच्या आणि १५ टक्के एकात्मिक योजनेतील घरांना अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे, इच्छुकांनी ही घरे नाकारली आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने या सोडतीत या योजनेतील घरे रिक्त राहण्याची शक्यता आहे. मात्र त्याचवेळी दुसरीकडे खासगी विकासकांच्या २० टक्के योजनेतील घरांना मात्र अर्जदारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ९० टक्क्यांहून अधिक अर्ज केवळ ५६५ घरांसाठी आहेत. त्यामुळे या घरांसाठी सर्वाधिक चुरस असणार असून ११ ऑक्टोबर रोजी कोणाचे स्वप्न पूर्ण होणार हे स्पष्ट होईल.