मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून मुंबईतील विविध ठिकाणच्या १४९ दुकानांचा सप्टेंबरमध्ये ई लिलाव करण्यात आला. मात्र यावेळी १४९ दुकानांपैकी कवळ ७० दुकानांचीच विक्री झाली आणि ७९ दुकाने विक्रीवाचून रिक्त राहिली. त्यामुळे आता या रिक्त ७९ दुकानांचा पुन्हा ई लिलाव करण्याची वेळ मुंबई मंडळावर आली आहे. त्यानुसार यासाठीची तयारी सुरु असून आठवड्याभरात ७९ दुकानांच्या ई लिलावाची जाहिरात प्रसिद्ध होणार असून त्यानंतर अर्जविक्री-स्वीकृतीस सुरुवात होणार आहे.
दरम्यान दुकानांचा बोली दर अधिक असल्याने अर्थात दुकाने महाग असल्याने ती विकली जात नसल्याचे स्पष्ट झाले. अखेर म्हाडा प्राधिकरणाने दर निश्चिती धोरणात बदल केला आहे. तेव्हा नवीन धोरणानुसार बोली निश्चित केल्याने अंदाजे ७५ दुकानांच्या बोली दरात ४ ते ५ लाख रुपयांचे घट झाली आहे.
म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पात रहिवाशांच्या सोयीसाठी काही दुकानेही बांधली जातात. या दुकानांची विक्री ई लिलाव पद्धतीने केली जाते. त्यानुसार आतापर्यंत मुंबईत मुंबई मंडळाने मोठ्या संख्येने दुकाने विकली आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून मुंबईतील दुकानांच्या ई लिलावाला प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. परिणामी मोठ्या संख्येने दुकाने रिक्त राहत असून त्यामुळे मंडळाचा महसूल अडकून रहात आहे. त्यामुळे आॅगस्टमध्ये मुंबई मंडळाने १४९ दुकानांची जाहिरात काढत ई लिलावाची अर्जविक्री-स्वीकृतीला सुरुवात करून सप्टेंबरमध्ये ई लिलावाचा निकाल जाहिर करण्यात आला.
यावेळी १४९ दुकानांपैकी केवळ ७० दुकानांची विक्री झाली आणि ७९ दुकाने रिक्त राहिली. दुकानांचा बोली दर अधिक असल्याने अर्थात दुकाने महाग असल्याने आणि त्यांची ठिकाणी व्यवसायाच्यादृष्टीने योग्य ठिकाणी नसल्याने प्रतिसाद मिळत नसल्याचे म्हटले जात आहे. ही बाब लक्षात घेत अखेर म्हाडा प्राधिकरणाने दुकानांच्या ई लिलावासाठीच्या बोली दरात घट करण्यासाठी नवीन धोरण आणले आहे. त्यानुसार आता दुकानांचे बोली दर निश्चित केले जात असल्याने दुकानांच्या बोली दरात ४ ते ५ लाखांनी घट झाल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे.
सप्टेंबरच्या ई लिलावात रिक्त राहिलेल्या ७९ दुकानांचा पुन्हा ई लिलाव करण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला आहे. त्यानुसार यासाठीच्या जाहिरातीचे काम अंतिम टप्प्यात असून आठवड्याभरात जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. बिंबिसार नगर, मुलुंड, चुनाभट्टी, कांदिवली, चारकोप, कोपरी पवई आदी ठिकाणच्या दुकानांचा यात समावेश आहे. नवीन धोरणानुसार ७९ पैकी ७५ दुकानांचे बोली दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे दुकाने ४ ते ५ लाखांनी स्वस्त झाल्याचेही अधिकार्यांनी सांगितले. या निर्णयामुळे यावेळी दुकानांच्या ई लिलावाला चांगला प्रतिसाद मिळेल आणि दुकानांची विक्री होईल असा विश्वास मुंबई मंडळाला आहे. हा विश्वास किती खरा ठरतो हे ई लिलावाच्या निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल.
