मुंबई – म्हाडाच्या पुणे मंडळाकडून पुण्यातील २० टक्के सर्वसमावेशक योजना आणि १५ टक्के एकात्मिक योजनेतील ४,१८६ घरांसाठी नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया १ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार होती. मात्र त्याआधीच मंडळाने या प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता ही प्रक्रिया २१ नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. या मुदतवाढीमुळे २१ नोव्हेंबर रोजी काढण्यात येणारी सोडत आता लांबणीवर गेली आहे. आता ११ डिसेंबरला सोडत काढली जाईल.

पुणे मंडळाने सप्टेंबरमध्ये पुण्यातील ४,१८६ घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या जाहिरातीनुसार १५ टक्के एकात्मिक गृहनिर्माण योजनेतील ८६४ घरे आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ३३२ घरे अशा एकूण ४,१८६ घरांसाठी ११ सप्टेंबरपासून नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली. सोडत पूर्व प्रक्रियेनुसार संगणकीय पद्धतीने अनामत रक्कम भरून अर्ज सादर करण्याची ३0 सप्टेंबरला रात्री ११.५९ वाजता संपणार होती. तर आरटीजीएस-एनईएफटीसह अनामत रक्कम भरत अर्ज सादर करण्याची मुदत १ नोव्हेंबर अशी होती. अर्जविक्री-स्वीकृती पूर्ण झाल्यानंतर पात्र अर्जांची यादी प्रसिद्ध करत २१ नोव्हेंबरला दुपारी १२ वाजता सोडत काढली जाणार होती. मात्र आता ही सोडत लांबवणीवर गेली आहे. सोडतीच्या नोंदणी, अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रियेस पुणे मंडळाने मुदतवाढ दिल्याने ही सोडत लांबणीवर गेली आहे.

सोडतीसाठी लागणारी कागदपत्रे जमा करण्यास इच्छुकांना वेळ लागत असल्याने इच्छुकांच्या मागणीनुसार या सोडतीला मुदतवाढ दिल्याची माहिती पुणे मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली. या मुदतवाढीनुसार २० नोव्हेंबरपर्यंत आता संगणकीय पद्धतीने अनामत रक्कम भरत अर्ज सादर करता येणार आहे. तर, २१ नोव्हेंबरपर्यंत आरटीजीएस-एनईएफटीद्वारे अनामत रक्कम भरत अर्ज सादर करता येणार आहे. त्यानंतर अर्जांची छाननी करत पात्र अर्जांची अंतिम यादी प्रसिद्ध करत ११ डिसेंबरला सोडत काढली जाणार असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले.

सोडतीतील १५ टक्के एकात्मिक योजनेतील घरे ४२ चौ.मी. ते ६६ चौ. मी. क्षेत्रफळाची असून या घरांच्या किंमती १३ लाख ६६ हजार ते ३० लाखांच्या दरम्यान आहेत. २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील बहुतांश घरे अल्प गटासाठी असून या घरांच्या किंमती १३ लाख ते ३८ लाखांच्या दरम्यान आहेत.