म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाचा निर्णय
मुंबई : मुंबईत पावसाचा जोर वाढू लागल्यानंतर अतिधोकादायक इमारती कोसळण्याची शक्यता निर्माण होते. असे असताना म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने जाहीर केलेल्या अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींच्या यादीतील काही इमारतींमध्ये १९७ रहिवासी वास्तव्यास आहेत. पावसाळ्यातील संभाव्य धोका लक्षात घेता आता मंडळाने पोलीस बळाचा वापर करून अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याचा निर्णय घेतला आहे.
दरवर्षीप्रमाणे मंडळाने मे अखेरीस मुंबईमधील अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची यादी जाहीर केली आहे. यंदा या यादीत १५ इमारतींचा समावेश आहे. ही यादी जाहीर केल्यानंतर पावसाळा सुरू होण्याआधी अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असते. त्यानुसार दुरुस्ती मंडळाने या प्रक्रियेस सुरुवात केली आहे. ४२४ निवासी रहिवाशांपैकी १५५ रहिवाशांनी स्वतः आपली पर्यायी व्यवस्था केली आहे. त्यामुळे उर्वरित रहिवाशांना संक्रमण शिबिरात स्थलांतरित करण्याची जबाबदारी मंडळावर होती. त्यानुसार या रहिवाशांवर निष्कासनाच्या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. ही नोटीस मिळताच काही रहिवाशांनी घरे रिकामी केली. मात्र १९७ रहिवासी अद्यापही अतिधोकादायक इमारतीतच वास्तव्यास आहेत. हे रहिवासी घर रिकामे करण्यास नकार देत आहेत, असे मंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
हेही वाचा >>>मुंबई: आज आणि उद्या समुद्राला मोठी भरती, पावणेपाच मीटर उंचीच्या लाटा उसळणार
पावसाचा जोर सध्या वाढत असल्याने या इमारतींचा धोकाही वाढत आहे. त्यामुळे आता या रहिवाशांकडून घरे रिकामी करून घेण्यासाठी पोलीस बळाचा वापर केला जाणार असल्याची माहिती मंडळाचे मुख्य अधिकारी अरूण डोंगरे यांनी दिली.
एकूण १५ पैकी दोन इमारतींचे पाडकाम पूर्ण
अतिधोकादायक १५ इमारतींपैकी ६ सहा इमारती पूर्णपणे रिकाम्या करण्यात मंडळाला यश आले आहे. या सहा इमारतींपैकी दोन इमारतींचे पाडकाम पूर्ण झाले असून चार इमारतींचे पाडकाम सुरू आहे. एका इमारतीची दुरूस्ती सुरू असून एका इमारतीचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आता लवकरच उर्वरित इमारतींमधील रहिवाशांना स्थालांतरित करण्यात येईल. इमारती रिकाम्या झाल्यानंतर तात्काळ त्यांचे पाडकाम हाती घेण्यात येईल, असे या अधिकाऱ्याने सांगितले.