वरळी येथील बीडीडी चाळ प्रकल्पाच्या आराखड्यातील बदल, ना. म. जोशी मार्ग येथे थंडावलेली कामे तसेच नायगाव येथे रखडलेल्या प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर कंत्राटदारांकडून प्रतिदिवशी खर्चाच्या नोंदी ठेवल्या जात आहेत. त्यामुळे प्रकल्पाच्या एकूण खर्चात २० ते २५ टक्क्यांनी वाढ अपेक्षित असून सध्या ती चिंता लागल्याचे म्हाडातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

हेही वाचा- म्हाडाची सोडत अधिक पारदर्शक आणि सुरक्षित; संगणकीय प्रणालीत ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर

वरळी येथील आराखड्यात महाविकास आघाडी सरकारने अचानक बदल केल्यामुळे सुधारित अभिन्यास तयार करण्याची पाळी म्हाडावर आली. त्यापोटी वास्तुरचनाकाराने म्हाडाला ११ कोटी ७० लाखांचे देयक सादर केले आहे. याशिवाय जे बदल सुचविण्यात आले आहेत ते प्रत्यक्ष अमलात आणण्यासाठी दोन ते अडीच हजार कोटींचा अतिरिक्त खर्च म्हाडाला सोसावा लागणार आहे. आता सुधारित अभिन्यासानुसार काम सुरू असल्यामुळे हा खर्चाचा बोजा म्हाडाला उचलावा लागणार आहे.

देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना बीडीडी चाळ प्रकल्प मार्गी लावण्यात आला. त्यानुसार वरळी येथे टाटा कॅपिसेट, ना. म. जोशी मार्ग येथे शापुरजी पालनजी आणि नायगाव येथे एल अँड टी अशा बड्या कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली. वरळी येथे सध्या पुनर्वसनाच्या इमारतीचे काम सुरू आहे. ना. म. जोशी मार्ग येथे संक्रमण शिबिराचे काम सुरू आहे, तर नायगाव येथे प्रत्यक्ष काम सुरू होऊ शकलेले नाही.

हेही वाचा- विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

वरळीच्या कामाचा प्रारंभ महाविकास आघाडी सरकारने मोठ्या थाटात केला. मात्र पूर्वीच्या आराखड्यामध्ये बदल केल्यामुळे प्रकल्पाला विलंब झाला तसेच यापोटी अतिरिक्त खर्चाचा बोजा म्हाडाला सहन करावा लागणार आहे. वरळी प्रकल्पाचे कंत्राट ११ हजार ७४४ कोटी रुपयांचे असून आराखड्यात बदल सुचविण्यात आल्यामुळे अभिन्यासही सुधारित सादर करावा लागला. सुधारित अभिन्यासापोटी वास्तुरचनाकार विवेक भोळे यांनी ऑक्टोबर २०२१ मध्ये म्हाडाला ११ कोटी ७० लाख ४८ हजार ७७८ रुपयांचे देयक सादर केले आहे. या प्रकल्पात वास्तुरचनाकाराला जुन्या कंत्राटानुसार आराखड्यापोटी एकूण कंत्राटाच्या पॉईंट ७५ टक्के म्हणजे ८० कोटींच्या आसपास व्यावसायिक शुल्क मिळणार आहे. त्यापैकी ११ कोटी ७० लाख रुपयांचे देयक द्यावे असे त्यांनी म्हाडाला पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.

हेही वचाा- दिवाळीनिमित्त जादा गाड्यांच्या नियोजनाला महामंडळाला विलंब; खासगी बस, रेल्वे गाड्यांचे आरक्षण फुल्ल

या पत्राची प्रत ‘लोकसत्ता’कडे आहे. सुधारित अभिन्यासामुळे कंत्राटाची एकूण रक्कम वाढणार असल्याचेही भोळे यांनी नमूद केले आहे.
राज्यात सत्ताबदल झाल्यामुळे आता बीडीडी चाळ प्रकल्पाबाबत काय भूमिका आहे, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. नायगाव येथील काम सुरू झालेले नसले तरी एल अँड टीने दररोजच्या खर्चाचे देयक सादर करण्यात सुरुवात केली आहे. यामुळे प्रकल्पाच्या खर्चात वाढ होणार असून त्याचा बोजा म्हाडावर पडणार आहे.