घरांसाठी काढण्यात येणारी सोडत अधिकाधिक पारदर्शक, सुरक्षित करण्यासाठी म्हाडाने सोडत प्रक्रिया १०० टक्के ऑनलाईन करून अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. त्याचाच भाग म्हणून म्हाडाने सोडतीतील मानवी हस्तक्षेप कायमस्वरूपी दूर करण्यासाठी आणि अर्जदारांची माहिती-कागदपत्रे सुरक्षित ठेवण्यासाठी सोडत संगणकीय प्रणालीत अत्याधुनिक अशा ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. या तंत्रज्ञानामुळे प्रणालीत कोणत्याही प्रकारे छेडछाड करता येणार नाही.

हेही वाचा- खंडणीप्रकरणी छोटा शकील विरोधात मुंबईत गुन्हा दाखल; पाच कोटी व भूखंड मागितल्याचा आरोप

म्हाडा सोडतपूर्व प्रक्रिया पूर्णत: ऑनलाईन आहे. मात्र सोडतीनंतरची प्रक्रिया अद्याप ऑनलाईन झालेली नाही. त्यामुळे सोडतीनंतरची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी बराच वेळ लागत असून त्यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. अशी प्रकरणेही मोठ्या संख्येने समोर आली आहेत. या पार्श्वभूमीवर सोडतीनंतरचीही प्रक्रिया, एकूण संपूर्ण सोडत ऑनलाईन करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यानुसार नवीन संगणकीय प्रणाली आयआयटीच्या मदतीने तयार करून घेण्यात आली आहे. या प्रणालीची चाचणी सुरू असून त्यात आवश्यकतेनुसार बदल करण्यात येत आहेत. हे बदल पूर्ण करून लवकरच यासंबंधीचा ठराव प्राधिकरणासमोर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार आहे.

हेही वाचा- विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

सोडतीत पारदर्शकता आणण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण बदल करतानाच त्यासाठी अत्याधुनिक अशा ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. या तंत्रज्ञानामुळे संगणकीय प्रणालीत कोणत्याही प्रकारे मानवी हस्तक्षेप केला जाऊ शकत नाही. प्रणालीत कोणत्याही प्रकारे छेडछाड करता येत नाही. त्यामुळे सर्व माहिती अत्यंत सुरक्षित राहण्यास मदत होते. अशावेळी या तंत्रज्ञानाची म्हाडा सोडतीवरील विश्वासार्हता वाढविण्यास आणि सोडत अधिक सुरक्षित करण्यास मदत होईल, असा दावा करण्यात आला आहे. नव्या सोडत प्रक्रियेनुसार अर्जदारांकडून सोडतीआधीच आवश्यक ती कागदपत्रे जमा करुन घेण्यात येणार आहेत. त्यामुळे ही कागदपत्रे सुरक्षित राहतील का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पण आता ब्लॉकचेन तंत्रज्ञानामुळे कागदपत्रे सुरक्षित राहणार असून सोडतही सुरक्षित असल्याचा दावा करण्यात येत आहे.