scorecardresearch

Premium

विश्लेषण : जिथे कमी तिथे मोदी? भाजपची लोकसभेसाठी काय आहे रणनीती?

भाजपने पराभव झालेल्या १४४ जागांवर यंदा लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांची योजना या मतदारसंघात करण्यात आली आहे.

modi rally
गेल्या वेळी त्यांना लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ३०३ जागा मिळाल्या होत्या. (File photo/PTI)

-हृषिकेश देशपांडे

लोकसभेच्या निवडणुकीला अद्याप दोन वर्षांचा कालावधी आहे. सत्ताधारी भाजपने सलग तिसऱ्यांदा सत्तेसाठी आखणी सुरू केली आहे. गेल्या वेळी त्यांना लोकसभेच्या ५४३ जागांपैकी ३०३ जागा मिळाल्या होत्या. भाजपने पराभव झालेल्या १४४ जागांवर यंदा लक्ष केंद्रित केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांची योजना या मतदारसंघात करण्यात आली आहे. पक्षाची ही नेमकी योजना कशी आहे?

मोदींची किमया

भाजपला मानणाऱ्या मतदारांव्यतिरिक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असा दहा टक्के मतदार वर्ग आहे. मोदी पक्षासाठी ही अतिरिक्त मते खेचून आणतात. राष्ट्रीय राजकारणात मोदींनी प्रवेश केल्यापासून त्यांचे वलय वाढतच आहे. मोदींचे वक्तृत्व, सतत कार्यरत राहण्याची पद्धत, हिंदुत्वाच्या प्रतीकांचा वापर यांच्या आधारे मोदींना टक्कर देईल असा जवळपास एकही नेता देशात नाही. विरोधकांनी एकत्र येऊन लढत देणे ही बाब वेगळी, पण लोकप्रियतेच्या बाबतीत मोदी सरस आहेत. मोदी पंतप्रधानपदी आरूढ होऊन आठ वर्षे झाली तरी, विरोधकांना मोदींवर व्यक्तिगत आरोप करता आलेला नाही. आंतरराष्ट्रीय राजकारणातही मोदींनी एक स्थान मिळवले आहे. या साऱ्याचा वापर भाजप प्रचारात करणार हे उघड आहे. त्यामुळेच गेल्या वेळी पराभूत झालेल्या जागांवर मोदींच्या सभांचा सपाटा लावून विजय मिळवण्याचे भाजपचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी खास रचना आहे.

विकास तसेच राष्ट्रवादाचा मुद्दा

ज्या मतदारसंघांत गेल्या वेळी भाजपचा पराभव झाला तेथे केंद्रीय मंत्र्यांकडे जबाबदारी देऊन संपर्क दौरे आखण्यात आले आहेत. संघ परिवारासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांशी संवाद, सभा, बैठका तसेच पक्षाच्या समितीकडून यावर देखरेख ठेवण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्र्यांशी या संदर्भात चर्चा करून याचा आढावा घेतला. आता या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात या मतदारसंघांमध्ये पंतप्रधानांच्या सभांचे आयोजन केले जाणार आहे. गेल्या काही दिवसांत पंतप्रधानांनी तीन डझनहून अधिक मोठ्या प्रकल्पांचे लोकार्पण किंवा भूमिपूजन केले आहे. याद्वारे भाजपच्या विकासाच्या मुद्द्यावर भर दिला जात आहे. त्याला राष्ट्रवादाची जोड देऊन आता मतपेढी भक्कम करण्याचा प्रयत्न आहे.

पक्षासाठी अवघड जागा

भाजपच्या या योजनेत जिंकण्यासाठी कठीण किंवा विरोधातील प्रमुख नेत्यांच्या जागांवर लक्ष केंद्रित करण्याची योजना आहे. या मतदारसंघांमध्ये वातावरणनिर्मिती करून, विरोधी नेत्यांना मतदारसंघांमध्येच अडकवून ठेवण्याची खेळी आहे. यातील काही जागांमध्ये उत्तर प्रदेशातील रायबरेली हा सोनिया गांधी यांचा मतदारसंघ, तेलंगणमधील मेहबूबनगर, काँग्रेसचे मध्य प्रदेशातील ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचा छिंदवाडा, पवारांचा बारामती, उत्तर प्रदेशमधील मैनपुरी असे काही मतदारसंघ पक्षाने हेरले आहे, काही दिवसांपूर्वीच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या बारामती मतदारसंघाच्या दौऱ्यावर तीन दिवस होत्या. त्यावरून भाजपने ही योजना किती नियोजनपूर्वक आखली आहे हे स्पष्ट होते. आता पंतप्रधानांच्या सभांचे आयोजन हा पुढचा टप्पा आहे. यातील काही जागा तरी कठीण असल्या तरी भाजप अमेठीचा दाखला देत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांना उत्तर प्रदेशातील अमेठी या त्यांच्या परंपरागत मतदारसंघात २०१४मध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पराभूत केले होते.

सूक्ष्म नियोजनावर भिस्त

निवडणुका केवळ सभा तसेच सरकारच्या कामगिरीवर जिंकता येत नाहीत. त्यासाठी पक्षाचे सूक्ष्म नियोजन गरजेचे असते. त्या तंत्रात भाजप वाकबगार असल्याचे गेल्या काही निवडणुकांवरून दिसून आले आहे. वन बूथ टेन युथसारखी योजना किंवा पन्नाप्रमुख म्हणजेच मतदारयादीनिहाय संपर्क ठेवणे या उपक्रमातून भाजपने विविध निवडणुकांमध्ये यश मिळवले. आता २०२४च्या लोकसभा निवडणुकीची तयारी करताना दहा वर्षांच्या सत्तेनंतर काही प्रमाणात लोकांची नाराजी असणार हे लक्षात घेऊन जिथे विजय मिळाला नाही त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यासाठी पक्षाला निवडणूक जिंकून देणारी व्यक्ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांचा आधार घेतला जाणार आहे. त्यामुळे विरोधी नेत्यांचेही कसब पणाला लागणार आहे. आतापासूनच लोकसभेच्या प्रचाराची रणधुमाळी होण्याची चिन्हे आहेत.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 11-10-2022 at 07:16 IST

संबंधित बातम्या