मुंबई : मुंबईत मंगळवारी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेवरून धावणाऱ्या लोकलचे तीनतेरा वाजले होते. मध्य रेल्वेवर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने लोकल ठप्प झाल्या होत्या. परिणामी, मध्य रेल्वेवरील ८०० हून अधिक लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. तर, पावसामुळे बुधवारीही लोकलला फटका बसला. बुधवारी सकाळपासून लोकल १५ ते २० मिनिटे विलंबाने धावत होत्या. त्यामुळे कार्यालयात पोहोचण्यास प्रवाशांना विलंब झाला.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस पडत असून मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखलभागात पाणी साचले होते. तसेच मंगळवारी रेल्वे रुळांवर पाणी साचले होते. त्यामुळे लोकल, लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या चालवणे अशक्य झाले. परिणामी, लोकल सेवा ठप्प झाली होती. तसेच लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या काही काळ बंद ठेवाव्या लागल्या होत्या. तसेच काही लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या दुसऱ्या मार्गावर वळण्यात आल्या होत्या. मंगळवारी बरेच तास लोकल सेवा बंद असल्याने, कार्यालयातून परतीचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. काही कर्मचारी कार्यालयात थांबले होते.. मंगळवारी रात्री ९.३० नंतर लोकल सेवा सुरू झाली. त्यानंतर सर्व लोकल विशेष लोकल म्हणून चालवण्यात आल्या. यामुळे संपूर्ण दिवसभरात ८०० पेक्षा जास्त लोकल रद्द कराव्या लागल्या.
मुसळधार पावसामुळे मंगळवारी हार्बर मार्गावरील लोकल सेवा ठप्प झाली होती. रेल्वे मार्गावरील पाणी ओसरल्यानंतर मंगळवारी रात्री २ वाजता डाऊन हार्बर मार्ग आणि रात्री ३ वाजता अप हार्बर मार्ग सुरक्षित असल्याचे घोषित करण्यात आले. त्यानंतर बुधवारी सकाळपासून सर्व मार्गावरील लोकल सुरू करण्यात आल्या. परंतु, बुधवारी सकाळी पावसाचा जोर वाढला. त्यामुळे लोकलचा वेग मंदावला. बुधवारी सकाळी ११ नंतर पावसाचा जोर कमी झाल्याने, लोकल सेवा पूर्वपदावर येण्यास सुरुवात झाली होती.
ॲपवरून अयोग्य माहिती
रेल्वे प्रवासी ॲपवरून रेल्वेची माहिती पाहून लोकल प्रवास करतात. परंतु, ॲपवर अयोग्य माहिती प्रसारित होत असल्याने प्रवाशांचा गोंधळ उडाला. बुधवारी सकाळच्या सुमारास लोकल त्याच स्थानकात उभी असताना, ॲपवर लोकल सुटल्याचे दाखवण्यात आले होते. त्यामुळे प्रवाशांचा गोंधळ उडाला. बुधवारी दुपारी १२ नंतर पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने दुसऱ्या पाळीतील नोकरदार वर्गाने कार्यालयात जाण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोकलमध्ये गर्दी झाली होती.