मुंबई : दक्षिण मुंबईतील अत्यंत महत्त्वाचा आणि रहदारीचा असा १२५ वर्षांहून अधिक जुना प्रभादेवी पूल अखेर शुक्रवारी रात्री १० वाजता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. अटल सेतूला जोडणाऱ्या वरळी-शिवडी उन्नत रस्ता प्रकल्पाअंतर्गत हा पूल पाडून त्या जागी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्यात येणार आहे.
पूल बंद झाल्याने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) एक-दोन दिवसात पुलाच्या पाडकामाला सुरुवात केली जाणार आहे. पुलाचे पाडकाम अंदाजे ६० दिवस चालेल आणि त्यानंतर नवीन पुलाच्या बांधकामास सुरुवात करण्यात येणार आहे. नवीन पुलाचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी १६ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पुढील १६ महिने वाहनचालक, प्रवाशांना पर्यायी मार्गाने प्रवास करावा लागणार आहे.
सागरी मार्गाने वरळीवरून अटल सेतुला जाणे सोपे व्हावे यासाठी एमएमआरडीए वरळी-शिवडी उन्नत रस्ता बांधत आहे. हा रस्ता प्रभादेवी पुलावरून जाणार आहे. अशावेळी पुलाची वयोमर्यादा आणि दूरवस्था पाहता या पुलावरून नवीन पूल बांधताना जुना पूल पाडून त्याजागी नवीन पूल बांधणे आवश्यक आहे.
१२५ वर्षांहून अधिक जुना प्रभादेवी पूल अखेर शुक्रवारी रात्री १० वाजता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.https://t.co/2jrmCKvB4K#Mumbai #Road #bridge pic.twitter.com/mGNr6v0o6x
— LoksattaLive (@LoksattaLive) September 13, 2025
एमएमआरडीएने ही जबाबदारी स्वीकारली आणि जुना पूल पाडून त्याजागी नवीन द्विस्तरीय पूल बांधण्याचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार पूल वाहतुकीसाठी बंद करून पुलाचे बांधकाम करण्यासाठी परवानगी मिळावी यासाठी अनेक वर्षे एमएमआरडीए प्रयत्नशील होते. मात्र वाहतूक पोलिसांकडून परवानगी मिळत नव्हती. त्याचा मोठा फटका एमएमआरडीएला बसत होता. त्यामुळे ही परवानगी मिळविण्यासाठी एमएमआरडीएचे जोरदार प्रयत्न सुरू होते. अखेर फेब्रुवारीमध्ये त्यांना पूल बंद करून पाडकाम करण्यास आणि नवीन काम करण्यासाठी परवानगी मिळाली.
पण परीक्षांचा कालावधी लक्षात घेता एप्रिलमध्ये पूल बंद करण्याचा निर्णय झाला. उन्नत रस्त्याच्या कामात बाधीत होणाऱ्या दोन इमारतींमधील रहिवाशांनी योग्य पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून एप्रिलमध्ये आणि आता १० सप्टेंबरला पूल बंद होऊ दिला नाही. पण हा पूल पाडून नवीन पूल शक्य तितक्या लवकर बांधणे आवश्यक असल्याने अखेर उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीए अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी लक्ष घालून पुनर्वसनाचा प्रश्न गुरुवारी (११ सप्टेंबर) मार्गी लावला. म्हाडाच्या इमारतीत या रहिवाशांना घरे देण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्याच्या घराच्या क्षेत्रफळात वाढीव ३५ टक्के क्षेत्रफळ देण्याचाही निर्णय घेण्यात आला.
पुनर्वसनाचा मुद्दा मार्गी लावण्याबरोबर एमएमआरडीएने शुक्रवारी रात्री ११.५९ वाजता पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार असल्याची जाहीर केले. त्यानुसार तयारी करून रात्री पूल बंद केला. आता या पुलाचे पाडकाम एक-दोन दिवसात सुरू करण्यात येणार आहे. यासाठी क्रेन आणि इतर साहित्य सज्ज करण्यात आले आहे. पाडकामासाठी ६० दिवस लागणार असल्याचे एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. तर नवीन पुलाचे काम सुरू झाल्यापासून काम पूर्ण करेपर्यंत किमान १६ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. मात्र १२ महिन्यांत काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचेही अधिकाऱ्याने सांगितले. हा पूल आणि उन्नत रस्ता तयार झाल्यास वरळीतून अटल सेतूवर अवघ्या १५ मिनिटांत पोहचता येईल. तसेच या द्विस्तरीय पुलामुळे प्रभादेवीतील वाहतूक कोंडी दूर होईल, असा दावाही एमएमआरडीएने केला आहे.