मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका, पुणे वर्तुळाकार रस्ता आणि नांदेड-जालना द्रुतगती महामार्ग अशा तीन महत्त्वाकांक्षी प्रकल्पांच्या आर्थिक निविदा गुरुवारी खुल्या करण्यात आल्या. १८ कंपन्यांनी तीन प्रकल्पांतील २६ टप्प्यांसाठी एकूण ८२ निविदा सादर केल्या आहेत.

आता या निविदांची छाननी करून त्या अंतिम करण्यात येणार आहेत. आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर म्हणजेच जूनमध्ये या निविदा अंतिम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई महानगर प्रदेशाच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा विरार-अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेसाठी ३३ निविदा सादर झाल्या आहेत.

हेही वाचा – मुंबई : सिंधी निर्वासितांच्या पुनर्विकासाचा वाद न्यायालयात

मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी, तसेच विरार-अलिबाग अंतर कमी करण्यासाठी विरार-अलिबागदरम्यान १२८ किमीची बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका बांधण्यात येणार आहे. तर समृद्धी महामार्गाचा विस्तार जालना – नांदेडपर्यंत केला जाणार आहे. यासाठी ‘एमएसआरडीसी’ने १९० किलोमीटर लांबीचा जालना – नांदेड महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच वेळी पुण्यातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी पुणे रिंग रोड अर्थात पुणे वर्तुळाकार रस्ता बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार १३६ किमीचा रस्ता बांधण्यात येणार आहे.

हे तिन्ही प्रकल्प राज्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जात आहेत. या तिन्ही प्रकल्पांसाठी धोरणानुसार आवश्यक ७० टक्के भूसंपादन अद्याप पूर्ण झालेले नाही. पण निविदा अंतिम करून पुढील कार्यवाही पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर देकार पत्र देईपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास ‘एमएसआरडीसी’ने व्यक्त केला आहे.

हेही वाचा – अमली पदार्थ प्रकरण : समीर वानखेडेविरोधातील प्राथमिक चौकशीचे पुरावे सादर करा, उच्च न्यायालयाचे एनसीबीला आदेश

नामांकित कंपन्यांचा समावेश

‘एमएसआरडीसी’च्या स्वारस्य निविदेला २८ कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. यापैकी १९ कंपन्यांच्या निविदा पात्र ठरल्या होत्या. २६ टप्प्यांसाठी या कंपन्यांकडून एकूण ८२ निविदा सादर करण्यात आल्याची माहिती ‘एमएसआरडीसी’तील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. एल ॲण्ड टी, ॲपको इन्फ्राटेक, एनसीसी, पटेल इन्फ्रा, ॲफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर, पीएनसी इन्फ्रास्ट्रक्चर, नवयुग इंजिनीयरिंग कंपनी अशा नामांकित कंपन्यांचा यात समावेश आहे.