मुंबई : सीमाशुल्क विभागाने मुंबई विमातळावर केलेल्या कारवाई पाच किलो कोकेनसह परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थाची किंमत ५१ कोटी रुपये आहे. यामागे आंतरराष्ट्रीय टोळीचा सहभाग असून त्याबाबत सीमाशुल्क विभाग अधिक तपास करीत आहे.
सीमाशुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर कक्षाने (एआययू) ही कारवाई केली. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना एक संशयीत व्यक्ती कोकेनसह मुंबई विमानतळावर येणार असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारावर अधिकाऱ्यांनी मुंबईमधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी एका परदेशी नागरिकाला तपासणीसाठी थांबवले. त्याची झडती घेतली असता त्याने परिधान केलेल्या कमरेला बांधलेला ऑर्थो वेस्ट बेल्ट आणि पायात परिधान केलेल्या काल्फ सपोर्टर्समध्ये पांढऱ्या रंगाची भुकटी सापडली. घटनास्थळी तपासणी किटद्वारेन तपासणी केली असता ते कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाचे एकूण वजन ५१९४ ग्रॅम इतके असून, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत ५१ कोटी ९४ लाख रुपये आहे.
अंमली पदार्थ जप्त केल्यानंतर आरोपी परदेशी नागरिकाविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा, १९८५ (एनडीपीएस कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर याप्रकरणी परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली. आरोपी एका आंतराष्ट्रीय टोळीसाठी काम करीत होता. त्याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. आरोपीला या कामासाठी पैसे मिळणार होते. पण त्यापूर्वीच त्याला अटक झाली. त्याचा विमान प्रवास, तसेच येथील राहण्याचा खर्च मुख्य आरोपींकडून करण्यात आल्याचे त्याने चौकशीत सांगितले. याप्रकरणी सीमाशुल्क विभागातील अधिकारी अधिक तपास करीत आहे.
मुंबई कोकेनचे वितरण केंद्र
मुंबई व दिल्लीतील येणारा कोकेनचा साठा तुलनेने सर्वाधिक आहे. उच्चभ्रू तरूणांमध्ये कोकेनला जास्त मागणी आहे. दक्षिण अमेरिका व आफ्रीकी देशांतून कोकेनची सर्वाधिक तस्करी होते. कोकेनच्या वितरणाचे मुंबई प्रमुख केंद्र आहे. कोकेनच्या तस्करीसाठी पूर्वी आफ्रिका खंडातील गरीब देशांमधील नागरिकांचा वापर करण्यात येत होता.
सध्या दक्षिण अमेरिकेतील बोलिव्हिया, व्हेनेझुएला, गयाना, ब्राझील, कोलंबिया आणि सुरीनाम या देशांतील गरीब नागरिकांचाही कोकेनच्या तस्करीसाठी वापर होत आहे. कोकेनच्या तस्करीसाठी अदीस अबाबा ते दुबई व मग दुबई ते मुंबई हवाई मार्ग कुख्यात आहे. याच मार्गाचा वापर करून भारतात कोकेन येते. भारतात राहून बेकायदेशीर कामे करण्यासाठी तस्कर नवनवीन कार्यपद्धतीचा वापर करीत आहेत.