मुंबई : केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावली विरोधात मुंबईतील टँकर चालकांनी संप पुकारला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेने विहीर आणि कूपनलिका धारकांना बजावलेल्या नोटिशींना स्थगिती दिली. असे असूनही टँकर चालक संप मागे घेत नसल्याने व्यापक जनहित लक्षात घेता बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ लागू करुन त्यानुसार मुंबईतील विहिरी आणि कूपनलिका तसेच खासगी पाणीपुरवठा करणारे टँकर्स अधिग्रहित करण्याचा म्हणजेच ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे.
संपूर्ण यंत्रणा ताब्यात घेऊन मुंबई महापालिका खासगी गृहनिर्माण संस्था (सोसायटी) यांच्यासह संबंधित घटकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करणार आहे. त्याकरीता मुंबई महापालिकेने सुरळीतपणे करण्यासाठी महानगरपालिकेने प्रमाणित कार्यपद्धती देखील निश्चित केली आहे.

या बातमीसह विशेष लेख आणि इतर दर्जेदार मजकूर मोफत वाचा

मुंबईतील खासगी विहीर मालकांना केंद्रीय भूजल प्राधिकरणाची परवानगी सादर करण्याबाबत मुंबई महापालिकेने नोटीस बजावल्याच्या विरोधात टँकर मालकांच्या संघटनेने गुरुवारपासून संप पुकारला आहे. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून मुंबईतील अनेक सोसायट्या आणि विकासकामे यांना पाणी टंचाईचा फटका बसतो आहे. केंद्रीय भू-जल प्राधिकरणाचे बदललेले नियम आणि त्या पार्श्वभूमीवर मुंबईतील टँकरचालकांच्या मागण्या व त्यांचा संप यावर तातडीने तोडगा काढावा, अशी सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेला केली.

तसेच, केंद्रीय जलशक्ती मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय भू-जल प्राधिकरणाला निर्देश दिले की, ‘ना-हरकत प्रमाणपत्र’ प्राप्त करण्यासाठी उपलब्ध असलेली एक खिडकी प्रणाली ‘भू–नीर’ ही अधिक सुलभ करावी. या पार्श्वभूमीवर मुंबईतील विहीर व कूपनलिका धारकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने बजावलेल्या नोटिशींना १५ जून २०२५ पर्यंत महानगरपालिका आयुक्तांनी स्थगिती दिली होती. मात्र तरीही चालकांनी संप मागे घेतलेला नाही. त्यांच्या मागण्यांवर ते अडून आहेत. त्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता वाढत असताना पाण्यासारख्या जीवनावश्यक गरजेचा प्रश्न निर्माण होवू लागला आहे.

ही परिस्थिती लक्षात घेता, व्यापक जनहिताकरिता या समस्येचे निराकरण करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने आपत्कालीन व्यवस्थापन कायदा २००५ लागू केला आहे. तसेच, या कायद्यातील कलम ३४ (अ) तसेच कलम ६५ (१) द्वारे महानगरपालिका प्रशासनाला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारानुसार, मुंबईतील विहिरी आणि कूपनलिका तसेच खासगी पाणीपुरवठा करणारे टँकर्स अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या टॅंकरने मुंबई महापालिकेची यंत्रणा स्वत: पाणी पुरवठा करणार आहे. त्याकरीता नियमावली तयार करण्यात आली आहे. या कार्यपद्धतीमध्ये पालिकेची यंत्रणा, टॅंकर चालक, क्लीनर तसेच टॅंकर चालकांचे कार्यालयीन कर्मचारी, ट्रॅफिक पोलीस, पोलीस यांचीही मदत घेतली जाणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai amid tanker strike bmc to take over mumbais wells boreholes and private tankers mumbai print news sud 02