मुंबई : मुंबई महानगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केल्यानंतर कबुतरखान्यांच्या संरक्षणासाठी प्राणी-पक्षी मित्र संघटना सरसावू लागल्या आहेत. ‘पाल वेल्फेअर फाउंडेशन’ने मुंबईमधील कबुतरखान्यांवरील बंदीविरोधात रविवार, २० जुलै रोजी ३ वाजता सांताक्रुझ पश्चिम येथे मूक मोर्चाचे आयोजन केले आहे. दरम्यान, कबुतरांना जगण्याचा अधिकार असून कबुतरखान्यांवर कारवाई होऊ नये यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे.

कबुतरखाना, दौलतनगर, शास्त्रीनगर, लिंकिंग रोड, सांताक्रुझ (पश्चिम) येथून काढण्यात येणाऱ्या हा मोर्चाचा वीणा डेव्हलपर्स येथे समारोप होणार आहे. मूक मोर्चा शांततेत काढण्यात येईल, असे पाल फाउंडेशनचे संचालक सुधीर कुडाळकर यांनी सांगितले. दरम्यान, मुंबईतील कबुतरखान्यांमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने कबुतरखाने बंद करण्यासाठी तत्काळ मोहीम राबवावी, असे निर्देश विधान परिषदेत मुंबई महापालिकेला देण्यात आले होते.

त्यामुळे दादर कबुतरखान्यासह मुंबईतील अन्य ठिकाणचे कबुतरखाने बंद करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली होती. त्यानंतर लगेचच पालिकेने दादर पश्चिम येथील कबुतरखान्यावर कारवाई करून अनधिकृत बांधकाम हटवले आणि कबुतरांना दिले जाणारे खाद्य जप्त केले.

याआधी ‘पेटा’ची जाहिरात

दादरमधील कबुतरखाना परिसरात काही दिवसांपूर्वी ‘पेटा’ या प्राणी व पक्ष्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या संस्थेने कबुतरखान्यांचे समर्थनार्थ झळकवलेली जाहिरात अनेकांचे लक्ष वेधून घेत होती. मात्र वादग्रस्त ठरल्यानंतर ही जाहिरात काढून टाकण्यात आली. कबुतरांना जगण्याचा हक्क असल्याचे जाहिरातीत म्हटले होते. त्यामुळे कबुतरखाना परिसरातील नागरिकांनी या जाहिरातीला विरोध केला. वाढता विरोध लक्षात घेऊन संबंधित जाहिरात हटवण्यात आली.

विष्ठेतून पसरणारी बुरशी धोकादायक

कबुतरांच्या विष्ठेतील बुरशी आणि जीवाणूंमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. कबुतरांच्या विष्ठेत अस्परलिजस आणि क्रायकोकॉकस प्रकारची बुरशी सामान्यत: आढळून येते. कबुतरांची विष्ठा आणि पंख प्रामुख्याने श्वसनाच्या आजारांना कारणीभूत ठरतात. यामुळे अलर्जी होऊ शकते. दमादेखील होण्याची शक्यता असते.