मुंबई : मुंबईत पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सेवा वाढविण्यासाठी बेस्ट उपक्रमात टप्प्याटप्प्याने विद्युत बस दाखल होत आहेत. नुकत्याच बेस्ट उपक्रमात भाडेतत्त्वावरील १२ मीटर लांबीच्या ४ विद्युत बस दाखल झाल्या आहेत. या बस ओशिवरा आगारातून सुटणार आहेत.
बेस्ट बसचे तिकीट वाढल्याने बस फेऱ्यांची वारंवारता कमी झाल्याने प्रवाशांनी बेस्ट सेवेला पाठ दाखवली आहे. परिणामी, बेस्टच्या प्रवासी संख्येत प्रचंड घट झाली. त्यामुळे बेस्ट उपक्रमाने नवे मार्ग सुरू करण्यास आणि बसचा ताफा वाढविण्यावर भर दिला आहे. कुलाबा येथील बेस्ट कार्यालयात १२ मीटर लांबीच्या ४ विद्युत बस प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्या आहेत.
मुंबईत २५० विद्युत बस सुरू करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा हा प्रारंभ असून शहराच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नव्या उंचीवर नेण्याबरोबरच कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी हे एक निर्णायक पाऊल ठरणार आहे. ओशिवरा आगारामधून या बस कार्यरत राहतील. प्रवाशांच्या सोयीसाठी तसेच सर्वाधिक मागणी असलेल्या मार्गांना सेवा पुरविण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती बेस्ट उपक्रमातील अधिकाऱ्याने दिली.
- पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटीने डिझाइन व निर्मिती केलेल्या नव्या १२ मीटर लांबीच्या बस प्रवाशांच्या सोयीसह तयार केल्या आहेत.
- प्रत्येक बसमध्ये चालकासह ३६ प्रवाशांसाठी आसनव्यवस्था असून व्हीलचेअर प्रवेशाची सुविधा तसेच अधिक लवचिकतेसाठी ३ फोल्डेबल (घडीच्या) आसनांची व्यवस्था उपलब्ध करून दिली आहे.
- ४०० मिमी उंचीच्या लो-फ्लोअर डिझाइनमुळे बसमध्ये चढणे-उतरणे अधिक सुलभ झाले असून ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग प्रवाशांसाठी हा प्रवास अधिक सोयीस्कर व सर्वसमावेशक ठरतो.
- या बस एका चार्जवर २५० किमीपर्यंतचा प्रवास करू शकतात. ज्यामुळे त्या मुंबईच्या दैनंदिन शहरी मार्गांसाठी चालवणे सोयीस्कर होईल.
बेस्ट उपक्रमातील स्वमालकीचा ताफा १५ टक्के
बेस्ट उपक्रमातील स्वमालकीचा ताफा आता १५ टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. येत्या काळात बेस्ट बसचा स्वमालकीचा ताफा संपुष्टात येण्याची चिन्हे दिसून येत आहेत. बेस्ट उपक्रमातील १५ वर्षाचे आयुर्मान पूर्ण झालेल्या बस भंगारात काढण्यात येतात. त्यामुळे बेस्टमधील स्वमालकीचा बस ताफा झपाट्याने कमी होत आहे. परिणामी, प्रवाशांचा प्रवास गैरसोयीचा होते. सप्टेंबर २०२३ पर्यंत बेस्टकडे स्वमालकीच्या १,५०० बस होत्या. हा आकडा एप्रिल २०२४ पर्यंत १,१०० पर्यंत कमी झाला. मे २०२५ मध्ये ४३७ स्वमालकीच्या बस शिल्लक राहिल्या होत्या. सप्टेंबर २०२५ पर्यंत सुमारे ४०० पर्यंत कमी झाला आहे.