मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकावर रेल्वे कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केलं आहे. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसंच ऑफिस संपवून घरी जाणाऱ्या मुंबईकरांचे हाल होत आहेत. कारण लोकल सेवेचं संपूर्ण टाइमटेबल या आंदोलनामुळे कोलमडून पडलं आहे. रेल्वे कर्मचारी आणि मोटमरन यांनी आंदोलन सुरु केल्याने लोकल गाड्या एकाच ठिकाणी उभ्या आहेत.

लोकल ट्रेन एकाच जागी उभ्या असल्याने चाकरमान्यांचे हाल

NRUM या संघटनेने हे आंदोलन सुरु केलं आहे. मोटरमनही या आंदोलनात सहभागी झाले आहेत त्यामुळे लोकल गाड्या एकाच जागी उभ्या आहेत. घर गाठणारे प्रवासी लोकलमध्ये बसले आहेत. पण लोकल या एकाच जागी उभ्या राहिल्याने मध्य रेल्वेचं वेळापत्रक पूर्णपणे कोलमडलं आहे. प्रवाशांची मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी झाली आहे. संध्याकाळी ५ वाजून ५० मिनिटांपासून हे आंदोलन सुरु आहे. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गर्दी झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशनच्या बाहेरही लोकांची गर्दी झाली होती. या आंदोलनाचा फटका मध्य आणि हार्बर मार्गाला बसला आहे.

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी स्वप्नील लीला काय म्हणाले?

छत्रपती शिवाजी टर्मिनसवरुन आता लोकल ट्रेन सुरु झाल्या आहेत. जे आंदोलन सुरु होतं त्या कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन आम्ही आता लोकल ट्रेन सुरु केल्या आहेत. रेल्वे पोलिसांनी मुंब्रा अपघात प्रकरणात अभियंत्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले होते त्याचा निषेध नोंदवत हे आंदोलन करण्यात आलं होतं. पण माझ्यासह रेल्वेच्या उच्च अधिकाऱ्यांची या सगळ्या आंदोलन कर्त्यांशी चर्चा झाली. त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं आहे आणि लोकल ट्रेन सुरु करण्यात आल्या आहेत. GRP ने ज्या केसेस केल्या होत्या त्यांना विरोध दर्शवण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. साधारण ४५ मिनिटं आंदोलन सुरु होतं. त्यामुळे गाड्या उशिराने धावत आहेत पण आता लोकल सेवा सुरु झाली आहे अशी माहिती जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.