मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून कुर्ला भागातील अनेक नागरी प्रश्न प्रलंबित असून त्याबाबत नागरिकांनी महापालिका प्रशासनाकडे वारंवार लेखी तक्रारी केल्या आहेत. मात्र, महापालिकेकडूनही प्रतिसाद मिळत नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीने केला आहे. तसेच, महापालिका अपूर्ण व दिशाभूल करणारी लेखी उत्तरे देत आहे. अनेक वेळा उत्तरच देत नाहीत. या निष्क्रिय कारभाराचा निषेध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने एल विभागाचे सहाय्यक आयुक्तांना पाटी आणि पेन्सिल देऊन अनोख्या पद्धतीने निषेध केला.

कुर्ला पूर्व येथील रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते दुरुस्तीसंदर्भात वंचित बहुजन आघाडीचे स्वप्नील जवळगेकर यांनी महापालिकेकडे लेखी तक्रार केली होती. मात्र, एल विभागातर्फे त्यांना चुकीचे व दिशाहीन उत्तर देण्यात आले. कुर्ला स्थानक परिसरातील रस्ते व खड्डे दुरुस्तीबाबत तक्रार केली असताना पालिकेने कुर्ला रेल्वे स्थानकापासून अर्धा किलोमीटर अंतरावरील कामगार नगर येथील पर्जन्य जलवाहिन्यांवरील ढापे बदलीसंदर्भात उत्तर त्यांना पाठविले. त्यामुळे निष्काळजी कर्मचाऱ्यांच्या कामकाजाबाबत संशय व्यक्त करत बहुजन आघाडीने महापालिका आयुक्तांकडे संबंधित प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती.

तसेच, अनेक वेळा महापालिकेकडे केलेल्या लेखी तक्रारींना उत्तरच मिळत नसल्यामुळे महापालिका अधिकारी व कर्मचारी यांना शिक्षणाची गरज असल्याची टीका बहुजनच्या कार्यकर्त्यांनी केली. त्याबाबत पालिकेतील संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या निष्क्रिय व पक्षपाती कारभाराचा निषेध करण्यासाठी एल विभागाच्या सहाय्यक आयुक्तांना पाटी पेन्सिल देऊन निषेध केला. यावेळी बहुजन आघाडीच्या मुंबई अध्यक्षा स्नेहल सोहनी, संतोष अबुलगे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.