मुंबई : अंधेरी पश्चिमेकडील लोखंडवाला परिसरात नव्याने तयार करण्यात आलेल्या सिमेंट कॉंक्रीटच्या रस्त्यावर पुन्हा एकदा कंत्राटदाराने खोदकाम सुरु केले आहे. काही महिन्यातच या रस्त्याच्या काही भागावर तडे पडले असून हा रस्ता नव्याने तयार करावा लागणार आहे. कोट्यवधी रुपयांची रस्ते कामांची कंत्राटे मिळवणाऱ्या कंत्राटदारांनी व गुणवत्ता देखरेख संस्थांनी कामात कुचराई केल्यामुळे परिसरातील नागरिकांना पुन्हा एकदा गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई महापालिकेने हजारो कोटींची रस्ते कामे दोन टप्प्यात हाती घेतली आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील कामे सुरू असून या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर त्रुटी आढळल्या आहेत. रस्त्यांच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी गुणवत्ता संस्थांची नेमणूक केलेली असतानाही अनेक ठिकाणी रस्त्यांवर तडे गेले आहेत तर काही ठिकाणी रस्त्यांचा पृष्ठभाग उखडला आहे. सांताक्रूझ येथील भार्गव मार्गावरही रस्त्यावर तडे गेले आहेत. त्यातच आता अंधेरी लोखंडवाला परिसरातील अच्युतराव पटवर्धन मार्गावरही त्रुटी आढळल्या आहेत. त्यामुळे अंधेरीतील या मार्गावरील रस्त्याचा काही भाग उखडून तो पुन्हा नव्याने करण्याची वेळ आली आहे.

हेही वाचा…पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मूर्तिकारांना पुढील वर्षीही शाडूची माती मोफत देणार

दरम्यान, नव्याने तयार केलेल्या रस्त्यांची जुन्या रस्त्यापेक्षा दुर्दशा झाल्यामुळे गेल्याच आठवड्यात लोकप्रतिनिधींनी टीका केली होती. भाजपचे आमदार आशिष शेलार आणि शिवसेना (ठाकरे)पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणी चौकशीचीही मागणी केली होती. त्यामुळे रस्त्यांच्या कामांवर मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागली होती. दरम्यान, अंधेरी येथील रस्त्याचा पृष्ठभाग काही ठिकाणी उखडल्याचे आढळून आल्यामुळे रस्त्याचा तेवढा भाग कंत्राटदाराकडून नव्याने बांधून घेतला जात आहे.

रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणावर त्रुटी असल्यामुळे पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी काही दिवसांपूर्वी उपायुक्तांना रस्त्यांच्या कामांची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यात ज्या रस्त्यांवर त्रुटी आढळल्या आहेत त्या सर्व रस्त्यांची कंत्राटदाराच्या खर्चाने पुन्हा दुरुस्ती करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

हेही वाचा…मुंबई : गाडीचा धक्का लागला म्हणून खून…

कंत्राटदार, सल्लागार यांना दुप्पट दंड लावणार ….

रस्त्यांची कामे चांगल्या दर्जाची व्हावी याकरीता गुणवत्ता देखरेख संस्थांची नेमणूक केली आहे. तसेच या दोघांच्या कामावर अंकुश ठेवण्याची रस्ते विभागातील अभियंत्याचीही जबाबदारी आहे. मात्र या तिघांच्याही नजरेतून या त्रुटी सुटत असतील तर अक्षम्य बाब आहे. त्यामुळे जिथेजिथे रस्त्यांच्या कामाचा दर्जा नसेल तिथेतिथे कंत्राटदाराकडून पुन्हा काम करवून घेतले जाणार आहे. नागरिकांना पुन्हा पुन्हा गैरसोयीला सामोरे जावे लागत असल्यामुळे दुरुस्तीच्या खर्चाच्या दुप्पट दंड कंत्राटदाराला व गुणवत्ता देखरेख संस्थेला लावण्यात येणार आहे. तसेच अभियंत्यांनाही नोटीसा बजावण्यात येणार आहेत. अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai contraction again started digging newly constructed cement concrete road in lokhandwala area of andheri west mumbai print news sud 02