मुंबई : फलटण येथील डॉक्टर महिलेच्या मृत्यूचे प्रकरण ताजे असतानाच आता मुंबई महानगरपालिकेच्या कूपर रुग्णालयामध्ये रुग्णांच्या नातेवाईकांनी शुक्रवारी मध्यरात्री १ च्या सुमारास तीन डॉक्टरांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. या मारहाणीत ही तिन्ही डॉक्टर जखमी झाले असून, ते मानसिक तणावाखाली आहेत. याप्रकरणी कूपर मार्डकडून जुहू पोलीस ठाण्यांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
कूपर रुग्णालयांच्या आपत्कालीन विभागामध्ये शुक्रवारी रात्री गंभीर अवस्थेत आलेल्या रुग्णांवर कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर उपचार करीत होते. त्याचवेळी संमतीपत्रावर स्वाक्षरी करण्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना बोलावण्यात आले. मात्र त्यांनी काहीही विचारणा न करता थेट आतमध्ये येत कर्तव्यावर असलेले आपत्कालीन वैद्यकीय अधिकारी (सीएमओ), आंतरवासिता डॉक्टर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांना वाचविण्यासाठी पुढे गेलेल्या निवासी डॉक्टरलाही मारहाण करण्यात आली. याप्रकरणी शनिवारी पहाटे जुहू पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाण झालेल्या डॉक्टरांवर उपचार करण्यात आले, असून त्यांची प्रकृती ठीक आहे. मात्र ते मानसिक तणावाखाली असल्याची माहिती कूपर मार्डचे अध्यक्ष डॉक्टर चिन्मय केळकर यांनी दिली.
दरम्यान, डॉक्टरांना मारहाण करण्यात आली त्यावेळी रुग्णाचा मृत्यू झाला आहे असे डॉक्टरांकडून जाहीर करण्यात आले नव्हते, मात्र त्यापूर्वीच रुग्णांच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. याप्रकरणी शैक्षणिक अधिष्ठाता डॉ. नीलम रेडकर यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून, ही समिती काय निर्णय घेते यावरून पुढील भूमिका घेण्यात येईल, असे कूपर मार्डचे अध्यक्ष डॉक्टर चिन्मय केळकर यांनी सांगितले.
