मुंबई : बेल्जियममधून २८१ ग्रॅम मेथॅम्फेटामाइन (एमडी), एमडीएमए गोळ्या आणि पावडर मागवल्याच्या आरोपांप्रकरणी पुणेस्थित २३ वर्षांचा कुस्तीपटू काईल कमिंग्स याच्यावर खटला चालवण्यासाठी पुरेसे पुरावे असल्याचे सकृतदर्शनी स्पष्ट होते, असे नमूद करून विशेष न्यायालयाने त्याची दोषमुक्तीची मागणी फेटाळली. त्यामुळे, कमिंग्स याच्यावर आता खटला चालणार आहे. कमिंग्स याने आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.

कमिंग्स याला उच्च न्यायालयाने गेल्या वर्षी जामीन मंजूर केला होता. त्यानंतर, कमिंग्स याने गुन्ह्यात सहभागी असल्याचा कोणताही थेट पुरावा नाही, असा दावा करून प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. तथापि, आर्थिक व्यवहारांची माहिती देणाऱ्या बँक खात्यांच्या तपशीलाशी संबंधित पोलिसांनी सादर केलेले पुरावे कमिंग्सवर खटला चालवण्यासाठी पुरेसे आहेत, असे निरीक्षण नोंदवून विशेष न्यायालयाचे न्यायाधीश एस. एम. पाटील यांनी त्याचा अर्ज फेटाळून लावला.

तत्पूर्वी, कमिंग्स याच्याकडे कोणत्याही प्रकारचे अमली पदार्थ आढळून आलेले नाही किंवा जप्त करण्यात आलेले नाही. तथापि, त्याला सहआरोपीचा जबाब आणि बनावट पार्सलच्या आधारे खोट्या प्रकरणात गुंतवण्यात आले आहे, असा युक्तिवाद दोषमुक्तीची मागणी करताना कमिंग्स याच्यातर्फे करण्यात आला. तर, कमिंग्स याने सहआरोपी श्रवण जोशी याला अमली पदार्थाचे पार्सल स्वीकारण्यास सांगितले होते, असा दावा सरकारी वकिलांनी केला व कमिंग्सच्या मागणीला विरोध केला. कमिंग्स याने गुगल पेद्वारे ५२८ रुपये पार्सल पोहोचवण्याचे शुल्क भरले होते. त्यामुळे, पार्सलमध्ये नेमके काय आहे याची त्याला पूर्ण माहिती होती, असा दावाही सरकारी वकिलांतर्फे करण्यात आला. सबंधित पार्सलमध्ये २३० ग्रॅम एमडीएमए असल्याचा आरोप आहे.

न्यायालयाचे म्हणणे…

दोन्ही बाजू ऐकल्यानंतर आणि आरोपपत्राचा विचारात घेतल्यानंतर विशेष न्यायालयाने कमिंग्स याची दोषमुक्तीची मागणी फेटाळली. कमिंग्सकडून कोणतेही अमली पदार्थ जप्त केले गेले नाही हा बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद त्याला दोषमुक्त करण्यासाठी पुरेसा नाही. किंबहुना, त्याची कृती आणि इतर आरोपींशी समन्वयातून त्याचा गुन्ह्यातील सहभाग सकृतदर्शनी स्पष्ट होत असल्याचे न्यायालयाने कमिंग्सला दिलासा नाकारताना स्पष्ट केले.

प्रकरण काय ?

विशेष तपास पथक आणि गुप्तचर शाखेने संयुक्तरित्या एक पार्सल पुणे टपाल कार्यालयामध्ये रोखले होते. तपासणी केल्यानंतर अधिकाऱ्यांना त्या पार्सलमध्ये २३० ग्रॅंम अमली पदार्थ असल्याचे आढळले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पार्सल पुण्याला पाठवून सापळा रचला. श्रवण जोशी नावाची व्यक्ती पार्सल घेऊन जाण्यासाठी आली आणि त्याने सीमाशुल्क भरले असता त्याला अटक करण्यात आली. त्याच्या जबाबानंतर आर्यन हळदणकर आणि कमिंग्स यांनाही अटक करण्यात आली. तिघांविरोधात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

कमिंग्सने सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. परंतु, त्याचा गुन्ह्यात पुरेसा सहभाग असल्याचे स्पष्ट होते, असे नमूद करून न्यायालयाने त्याचा अर्ज फेटाळला होता. त्यादरम्यान, श्रवण जोशीला जामीन मंजूर करण्यात आला. जामीन नाकारण्याच्या निर्णयासह जोशीला जामीन देण्याच्या आदेशालाही कमिंग्सने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने कमिंग्सला डिसेंबर महिन्यात जामीन मंजूर केला होता.