मुंबई : मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने शहरात ठिकठिकाणी छापे मारून साडेचार किलोचे मेफेड्रॉन अमली पदार्थ जप्त केले. त्याची एकूण किंमत १० कोटी रुपये आहे. या प्रकरणात ५ जणांना अटक करण्यात आली असून त्यात एका नायजेरियन नागरिकाचाही समावेश आहे.

शहरात अमली पदार्थांची विक्री आणि सेवनाचे प्रमाण वाढत आहे. हे प्रकार रोखण्यासाठी अमली पदार्थ विरोधी विभाग सक्रिय झाला आहे. मागील आठवड्यापासून अमली पदार्थ विभागाने विशेष मोहीम हाती घेतली होती. अमली पदार्थ विरोधी विभागाच्या घाटकोपर, वांद्रे आणि वरळी कक्षाने मालाड, जोगेश्वरी, दादर आणि डोंगरी परिसरात छापे घातले. यावेळी करण्यात आलेल्या कारवाईत एकूण साडेचार किलो मेफेड्रॉन (एमडी) जप्त करण्यात आले. त्याची किंमत १० कोटी ७ लाख रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पाच आरोपींना अटक

या प्रकरणी ५ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यात एका नायजेरियन नागरिकाचा समावेश आहे. आरोपींविरोधात एनडीपीएस काया १९८५ च्या कलमाअंतर्गत विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आरोपींमध्ये अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या अन्य साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांचे आवाहन

अमली पदार्थ विक्रीबाबत काही गोपनिय माहिती मिळाल्यास अमली पदार्थ विरोधी शाखेच्या मदत क्रमांक ९८१९१११२२२ वर किंवा नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या मानस १९३३ या राष्ट्रीय मदत क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

या पथकाने केली कारवाई

अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सुधीर हिडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थ विरोधी शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक (वांद्रे) विशाल चंदनशीवे, अनिल ढोले (घाटकोपर), संतोष साळुखे (वरळी) यांच्या पथकाने ही कारवाई केली.