मुंबई : अंधेरीमध्ये एका वृध्दाची सोनसाखळी खेचून फरार झालेल्या त्रिकुटाला अंधेरी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने मुंब्रा येथून अटक केली. तब्बल ३०० सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रणाच्या आधारे माग काढत पोलिसांनी या आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

फिर्यादी शंकर जोशी ५ मे रोजी रात्री ११.१५ च्या सुमारास अंधेरीतील विजयनगर सोसायटीच्या समोरील पदपथावरून जात होते. त्यावेळी एका इसमाने त्यांना हेतुपरस्सर धक्का मारला. त्यानंतर त्याच्या अन्य तीन साथीदारांनी जोशी यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्याची सोनसाखळी खेचून पळ काढला. सोनसाखळीची किंमत सुमारे दोन लाख रुपये इतकी होती. या प्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

३०० सीसीटीव्हीच्या आधारे काढला माग…

अंधेरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने या गंभीर चोरीचा तपास करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक परकाळे आणि पोलीस उपनिरीक्षक सुपे यांचा समावेश असेलली दोन पथके तयार केली. घटनास्थळावर सीसी टीव्ही कॅमेरे नव्हते. त्यामुळे आरोपी ज्या मार्गावरून पळून गेले तेथील सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासण्यात आले. सुमारे ३०० सीसी टीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रण तपासण्यात आले.

गुन्हा केल्यानंतर जवळपास तीन तासांनी आरोपी वाकोला जंक्शन येथे एका खासगी टॅक्सीत बसल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार ऑनलाईन वाहनांची सर्विस देणाऱ्या सर्व कंपन्यांकडून माहिती मागविण्यात आली. या माहितीचा तांत्रिक तपास करून एक वाहन निष्पन्न केले. या वाहन चालकाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे वाहन आरक्षित करणाऱ्या व्यक्तीचा मोबाइल क्रमांक मिळवून तांत्रिक तपास करण्यात आला. संशयीत आरोपी मुंब्रा येथे असल्याचे निष्पन्न झाले.

मुंब्रा परिसर दाटीवाटीचा असून तेथे मोठ्या प्रमाणावर झोपडपट्टी आहे. त्यामुळे आरोपींना शोधण्याचे मोठे आव्हान होते. पोलिसांनी स्थानिक खबरी आणि तांत्रिक विश्लेषण करून माहिती मिळवली. मुब्रा येथे सापळा रचून एका आरोपीला अटक करण्यात आली. त्याची चौकशी केली असता त्याने अन्य दोन आरोपींची माहिती दिली. त्याच्या आधेरे दोघांना अटक करण्यात आली. वसीम नूर मोहम्मद शेख (३०), शहीद फरुख शेख (२०), तौफिक रियाज अहमद इदरीशी (२१) अशी आरोपींची नावे आहे. त्यांनी चोरलेली दीड लाखांची सोनसाखळी जप्त करण्यात आली.

पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ (परिमंडळ १०) सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत भोसले (अंधेरी विभाग) वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक (गुन्हे) विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंधेरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कारवाई केली.