मुंबई : हल्ली केवळ दिवाळीतच नव्हे तर वर्षभर निरनिराळे कार्यक्रम, उत्सवांच्या निमित्ताने फटाक्यांची आतषबाजी करण्यात येत आहे. त्यामुळे फटाके फोडण्यावर निर्बंध घालावे, अशी मागणी एका पर्यावरणवादी संस्थेने ऑनलाईन याचिकेद्वारे केली आहे. रात्री १० नंतर फटाके फोडण्यावर बंदी घालावी, तसेच फटाके केवळ सणापुरते मर्यादित ठेवावे, फटाके फोडण्याबाबत धोरण आखावे, अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई महापालिका आयुक्त, मुंबई पोलिस आयुक्त यांना उद्देशून ही याचिका तयार करण्यात आली आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पहाटे ४.३० पर्यंत फटाके वाजवले जात होते. फटाक्यांची आतषबाजी आता फक्त दिवाळीपुरती मर्यादित राहिलेली नाही. लग्न, वाढदिवस, क्रिकेट सामने, नवीन वर्ष, गणेशोत्सव, ईद, होळी यासह सर्वच उत्सवात फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते. त्यामुळे पाळीव प्राणी आणि वन्यजीव घाबरतात. तसेच लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक यांनाही त्रास होतो. फटाक्यांच्या आतषबाजीमुळे हवेच्या गुणवत्तेचा दर्जा घसरतो, असे या याचिकेत म्हटले आहे.

मोठ्या आवाजातील संगीत आणि सार्वजनिक कार्यक्रम रात्री १० पर्यंत काटेकोरपणे बंद केले जातात. ते योग्य आहे. मग पहाटेपर्यंत फटाक्यांची आतषबाजी करण्याची परवानगी का दिली जाते, शांतता, सुरक्षितता आणि आदराचा समान नियम सर्वांना लागू होऊ नये का ? असा सवाल या याचिकेद्वारे उपस्थित करण्यात आला आहे. यासंदर्भात नियमन करावे, अशीही मागणी संस्थेने केली आहे.

संस्थेच्या मागण्या

मुंबई आणि महाराष्ट्रात रात्री १० पर्यंत फटाक्यांसाठी प्रतिबंध लागू करा.

फटाके फक्त मोठ्या सणांपुरते मर्यादित ठेवा, प्रत्येक कार्यक्रम किंवा उत्सवाला वाजवू नये.

फटाके वाजवून उत्सव साजरा करणाऱ्यांनी पर्यावरणपूरक आणि बिन आवाजाचे फटाके फोडावे.

ध्वनी आणि वायू प्रदूषण कायदे समान रीतीने लागू करा. त्यात कोणतीही सूट देऊ नये.