Central Railway Power Block Between Karjat Khopoli: मध्य रेल्वेवरील कर्जत स्थानकावर कर्जत यार्ड रीमॉडेलिंग कामाशी संबंधित पूर्वतयारीची कामे करण्यासाठी गुरुवारी आणि शुक्रवारी दिवसा विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. या सलग दोन दिवस असलेल्या ब्लॉकमुळे काही कालावधीसाठी कर्जत-खोपोली दरम्यानची लोकल सेवा रद्द असेल.
कर्जत यार्ड रीमॉडेलिंग कामाशी संबंधित पूर्वतयारीची कामे करण्यासाठी गुरुवारी आणि शुक्रवारी सकाळी ११.२० वाजेपासून ते दुपारी १.५० वाजेपर्यंत ठाकूरवाडी केबिन आणि कर्जतदरम्यान, नागनाथ केबिन आणि कर्जत दरम्यान अप मार्गिकेवर ब्लॉक असेल. या ब्लॉक कालावधीत दुपारी १२ आणि दुपारी १.१० वाजता कर्जत-खोपोली लोकल सेवा रद्द असतील. सकाळी ११.२० आणि दुपारी १२.४० वाजता खोपोली-कर्जत लोकल सेवा रद्द असतील.
ब्लॉकमुळे मेल व एक्स्प्रेस रखडणार
चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, चेन्नई- अहमदाबाद हमसफर एक्स्प्रेस, पुणे-हजरत निजामुद्दीन दुरंतो एक्स्प्रेस, चेन्नई-लोकमान्य टिळक टर्मिनस अतिजलद एक्स्प्रेस या रेल्वेगाड्या लोणावळा येथून दुपारी १.०५ नंतर मुंबई दिशेने रवाना होतील. कोयंबतूर – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस लोणावळा येथे सकाळी ११.३० पासून तर, दुपारी १ पर्यंत थांबविण्यात येईल.