मुंबईकरांची लाईफलाईन असलेल्या लोकल प्रवाशांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आनंदवार्ता दिली आहे. आहे त्याच तिकीटदरात लोकल प्रवाशांना मेट्रोसारख्या एसी डब्यातून प्रवास करता येईल आणि त्याकरता तिकिटात एक रुपयाचीही वाढ केली जाणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री म्हणाले, ‘काही दिवसांपूर्वी मुंब्रा इथे मोठी दुर्घटना झाली. उपनगरीय लोकल सेवेला दरवाजे नसल्यामुळे अपघात होत आहेत. अतिशय वाईट परिस्थितीत लोक प्रवास करतात. आज दोन क्लास तयार केले आहेत. मेट्रो पूर्णपणे एसी आहे. दरवाजे बंद होतात. एसी असल्यामुळे चांगला प्रवास होत आहे. दुसरीकडे लोकल रेल्वे आहे. तिथे लोक दाटीवाटीत प्रवास करतात. दरवाजे नसल्यामुळे अपघात होतात. पंतप्रधान आणि रेल्वेमंत्र्यांकडे मागणी केली की मेट्रोसारखे कोचेस हे लोकल रेल्वेला दिले पाहिजेत. जे एसी असतील आणि दरवाजे बंद होतील. हे कोचेस लावले तरी तिकिटात एक रुपयाची देखील वाढ केली जाणार नाही अशी मागणी केली आहे. आम्ही यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेतो आहेत. लवकरच यासंदर्भात मुंबईत येऊन ते घोषणा करतील. लवकरच लोकल रेल्वेचे डबे मेट्रोसारखे एसी असतील. रेट्रोफिटिंग नाही. नवीन डबे असतील. चांगल्या पद्धतीचे डबे असतील. दरवाजे बंद होतील आणि डबे एसी असतील. तिकिटात कोणतीही दरवाढ केली जाणार नाही’.
ऑक्टोबर अखेरीपर्यंत कुलाबा ते आरे पूर्ण मार्ग सुरू होणार
मेट्रो संदर्भातही मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली. त्यांनी सांगितलं की, ‘मेट्रो ३ चे दोन टप्पे खुले झाले आहेत. लवकरच कुलाबा ते आरे जेव्हीएलआर असा संपूर्ण मार्ग कार्यान्वित होईल. ऑक्टोबरपर्यंत हा मार्ग कार्यान्वित करण्याचा आमचा प्रयत्न असेल. विक्रोळी ते मंडाले, ठाणे ते कल्याण हे अन्य १३ मेट्रो मार्गाचं कामही प्रगतीपथावर आहे. एकात्मिक तिकीट प्रणाली तयार केली आहे. ती यशस्वी झाली आहे. त्याच्या चाचण्या सुरू आहेत. एकात्मिक प्रणालीमुळे एक तिकीट घेतलं तर या तिकिटावर मेट्रो, लोकल रेल्वे, मोनो, बेस्ट बस आणि वॉटर ट्रान्सपोर्ट अशा सगळ्या वाहतुकीच्या माध्यमातून प्रवास करता येणार आहे. हे तिकीट व्हॉट्सअपवर देखील उपलब्ध होणार आहे’. दरम्यान हे तिकीट व्हॉट्सअपवर मिळणार असलं तरी निवडणुकीचं तिकीट व्हॉट्सअपवर उपलब्ध होणार नाही असं टोलाही त्यांनी लगावला.