मुंबई : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील (सीेएसएमटी) ३६ तासांचा ब्लाॅक संपला असून सीएसएमटी येथे बंद असलेली लोकल सेवा सुरू झाली आहे. ब्लाॅक कालावधीत हार्बर मार्गावरील लोकल वडाळ्यापर्यंत तर मुख्य मार्गावरील लोकल दादर, परळ आणि भायखळ्यापर्यंत धावत होत्या. त्यामुळे शनिवारी संपूर्ण दिवस मुंबईकरांची प्रचंड तारांबळ झाली. मात्र, रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सीएसएमटीवरून लोकल सेवा चालू झाल्याने प्रवाशांची रेलचेल सुरू झाली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सीएसएमटी येथे फलाट क्रमांक १०-११ चा विस्तार करण्यासाठी शुक्रवारी मध्यरात्री १२.३० पासून ब्लाॅक सुरू झाला. या ब्लाॅकचे पडसाद शनिवारी दिसले. तसेच रविवारी दुपारी १२.३० वाजेपर्यंत ब्लाॅक नियोजित होता. त्यामुळे रविवारी सकाळी घराबाहेर पडलेल्या प्रवाशांना आणि पर्यटकांना भायखळा, वडाळ्यावरून बेस्ट बस, रिक्षा-टॅक्सीचा आधार घ्यावा लागला. मात्र प्रवाशांच्या तुलनेत बेस्ट सेवा अपुऱ्या असल्याने, बेस्टमध्ये गर्दी झाली होती. तसेच रविवारी सुट्टीच्या दिवशी कुटुंबियांसह बाहेर फिरण्यासाठी पडलेल्या प्रवाशांची मोठी अडचण झाली. रविवारी २३५ लोकलच्या फेऱ्या रद्द केल्याने दोन लोकलमधील वेळेचे अंतर जास्त होते. लोकल विलंबामुळे मुख्य आणि हार्बर मार्गावरील महत्त्वाच्या स्थानकात प्रवाशाची गर्दी झाली. प्रवासी बराचवेळ स्थानकात उभे राहून लोकलची वाट बघत होते. लोकल मिळाली तरी सकाळी भायखळा आणि वडाळ्यापर्यंत लोकल येत असल्याने, प्रवाशांना पुन्हा बेस्टने प्रवास करावा लागला. रिक्षा, टॅक्सी पकडून फोर्ट परिसर गाठणाऱ्यांची, टॅक्सी चालकांकडून प्रचंड आर्थिक लूट केली जात होती. तसेच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून पर्यायी वाहने धावत होती. मुलुंड, भांडूप, विक्रोळी, कांजूरमार्ग, घाटकोपर, कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, भायखळा या परिसरात प्रवाशांची गर्दी होती.

हेही वाचा – “तुम्ही मला असं ढकलू शकत नाही”, रवीना टंडनची भररस्त्यात बाचाबाची; कार पार्किंगवरून वाद, प्रकरण थेट पोलिसांत!

रविवारी दुपारी १२.३० वाजण्यादरम्यान सीएसएमटी येथील ब्लाॅकचा कालावधी संपला. तब्बल ३६ तासांनी सीएसएसटीवरून लोकल सेवा सुरू झाली. दुपारी १२.३४ वाजता भायखळ्यावरून रिकामी लोकल सुटली. ही लोकल दुपारी १२.४८ वाजता सीएसएमटी येथे पोहोचली. त्यानंतर सीएसएमटीवरून लोकल धावण्यास सुरुवात झाली. यासह नव्याने विस्तार केलेल्या फलाट क्रमांक १०-११ च्या मार्गावरून नवीन इंजिन चालविण्यात आले.

हेही वाचा – मुंबई : नौदल अधिकाऱ्याचे क्रेडीट कार्ड वापरून परदेशात खरेदी, कफ परेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

महाव्यवस्थापकांनी मानले आभार

मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील फलाट क्रमांक १०-११ चे २४ डब्यांच्या विस्ताराचे आव्हानात्मक काम यशस्वीरित्या पूर्ण झाले. त्याचा फायदा लोकल आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांना होईल. मूलभूत पायाभूत सुविधांचा दर्जा सुधारण्याच्या या संपूर्ण प्रयत्नात पाठिंबा देणाऱ्या मुंबईकरांच्या भावनेचे कौतुक करतो. – राम यादव, महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai local railway start up to csmt mumbai print news ssb