मुंबई : घाटकोपर स्थानकादरम्यान झालेला तांत्रिक बिघाड, मानखुर्द – वाशी दरम्यान रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशाला लोकलची लागलेली धडक आणि गोरेगाव स्थानकादरम्यान झालेला तांत्रिक बिघाड यामुळे बुधवारी दुपारी मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावरील लोकलचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते. या तिन्ही मार्गांवरील लोकल विलंबाने धावत होत्या. परिणामी, प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागला.

मध्य रेल्वेवरील घाटकोपर स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल सेवा विस्कळीत झाली होती. अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल १० ते १५ मिनिटे विलंबाने धावत होत्या. गुरुवारी दुपारी २ च्या दरम्यान पाॅइंंटमध्ये बिघाड झाल्याने लोकल सेवा काही वेळ ठप्प झाली होती. या घटनेची माहिती मिळताच संबंधित विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन दुरूस्तीचे काम हाती घेतले. या कालावधीत अनेक लोकल एका मागे एक उभ्या होत्या. दुपारी २.१४ वाजता दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. परंतु, मध्य रेल्वेचे वेळापत्रक बिघडल्याने अनेक लोकल उशिराने धावत होत्या.

हार्बर मार्गावरील मानखुर्द – वाशीदरम्यान बुधवारी दुपारी १२ च्या सुमारास रेल्वे रूळ ओलांडणाऱ्या एका प्रवाशाला धावत्या लोकलची धडक लागली. त्यामुळे या मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली होती. लोकल सेवा पूर्वपदावर येण्यास बराच विलंब झाला. पश्चिम रेल्वेवरील गोरेगाव स्थानकादरम्यान बुधवारी तांत्रिक बिघाड झाल्याने, पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवा विस्कळीत झाली. अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल एका मागे एक उभ्या होत्या.

तांत्रिक बिघाड आणि विस्कळीत झालेली लोकल सेवा यामुळे प्रवासी संतप्त झाले होते. दररोज लोकल उशिराने धावत असतात. तर, तांत्रिक बिघाडाची घटना घडल्यास आणखी विलंब होत असल्याने इच्छितस्थळी पोहचण्यास उशीर होतो. रेल्वेच्या लेटलतीफ कारभारामुळे होणाऱ्या त्रासाला प्रवासी वैतागले असून, याविरोधात समाज माध्यमावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करीत आहेत. गुरुवारी दुपार जलद लोकलने मुंबईकडे येत असताना अचानक लोकल थांबली. लोकल बराच वेळ मार्गस्थ होत नव्हत्या, असे प्रवासी रोहित कदम यांनी सांगितले.