मुंबई : बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीपाठोपाठच गुरुवारी मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बँकेची निवडणूक पार पडली. तब्बल ६० हजारांहून अधिक सभासद असलेल्या या बँकेच्या निवडणुकीला यंदा कामगारांसह अधिकारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला. संध्याकाळी उशीरापर्यंत ४५ टक्के मतदान झाले होते. यंदाच्या निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांचेही पॅनेल उतरले आहे. तर विद्यामान संचालक मंडळाचेही पॅनेल असून या पॅनेलचे उमेदवार हे आमदार प्रवीण दरेकर यांचे निकटवर्तीय असल्याचे बोलले जात आहे. तर सुप्रसिद्ध वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनेलने निवडणुकीआधीच माघार घेतली होती.

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्याची बँक असलेल्या ‘दि म्युनिसिपल को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडची पंचवार्षिक निवडणूक गुरुवार, २१ ऑगस्ट रोजी पार पडली. या निवडणुकीसाठी मुंबई महापालिका कामगार व कर्मचारी वर्तुळातील वातावरण गेल्या काही दिवसांपासून तापले होते. बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीनंतर या निवडणुकीलाही महत्त्व आले आहे. ही निवडणूक पुढे ढकलावी, अशी मागणी काही पॅनेलनी केली होती. मात्र ती मागणी मान्य झाली नाही व ठरल्याप्रमाणे गुरुवारी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सहकार पॅनेल, जय सहकार पॅनेल, बीएमसी सहकार पॅनेल, जय महाराष्ट्र सहकार पॅनेल (बच्चू कडू) अशी प्रमुख पॅनेल होती. बेस्टच्या पतपेढीच्या निवडणुकीची खूप चर्चा झाली. त्यामुळे या निवडणुकीला प्रथमच खूप प्रतिसाद मिळाला. या निवडणुकीसाठी २४ ठिकाणी ८४ मतदान केंद्रे तयार करण्यात आली होती. या निवडणुकीसाठी तब्बल पाच पॅनेल आणि १५३ उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी सकाळी कॉटनग्रीन येथे होणार आहे.

खाऊचा डबा आणि चिठ्ठी

या निवडणुकीच्या वेळी अनेक वेळा आचारसंहिता भंग झाल्याचा आरोप उमेदवारांनी केला. पालिका मुख्यालयासमोरील मतदान केंद्रावर १०० मीटर परिसराच्या आतच उमेदवारांच्या नावाने प्रचार केला जात असल्याचा आरोप बीएमसी सहकार पॅनेलचे उमेदवार गणेश पुराणिक यांनी केला असून या प्रकरणी त्यांनी पोलिस तक्रारही केली. अनेक ठिकाणी मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्तच नव्हता, अशी तक्रार जय महाराष्ट्र सहकार पॅनेलचे विकास घुगे यांनी केली. काही मतदान केंद्रांवर सभासदांना खाऊचे कागदी खोके दिले जात होते व त्यात उमेदवारांच्या नावाची चिठ्ठीही दिली जात असल्याचा प्रकार घुगे यांनी उघडकीस आणला.

साडे पाच हजार कोटींची उलाढाल

मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या बॅंकेची तब्बल साडेचार हजार कोटींची उलाढाल आहे. या बॅंकेच्या तब्बल २२ शाखा आहेत. ६० हजारांहून अधिक सभासद आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त या बँकेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर अतिरिक्त आयुक्त हे पदसिद्ध उपाध्यक्ष असतात. तसेच दोन उपायुक्त हे बॅंकेचे कार्याध्यक्ष व उप कार्याध्यक्ष असतात. त्या खालोखाल बॅंकेचे १९ सदस्यांचे संचालक मंडळ असते. या १९ सदस्यांच्या संचालक मंडळासाठी पंचवार्षिक निवडणूक घेण्यात येते. संपूर्ण मुंबईतील पालिकेची सर्व कार्यालये पालथी घालून या निवडणुकीचा प्रचार केला जातो. तसेच मुंबई बाहेर असलेल्या धरणक्षेत्रात काम करणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांपर्यंत उमेदवार पोहोचतात.