मुंबई : मुंबईतील भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी महानगरपालिकेच्या पशूवैद्यकीय आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या प्राणी जन्म नियंत्रण (ॲनिमल बर्थ कंट्रोल-एबीसी) उपक्रमाला प्राणीप्रेमींकडूनच विरोध होत असून उपक्रमाच्या अंमलबजावणीत अडथळा येत आहे. प्राणी कल्याण संस्थांचे स्वयंसेवक श्वानांना उचलून दुसऱ्या ठिकाणी नेतील, अशी भीती प्राणीप्रेमींना वाटत असल्याने एबीसी उपक्रमाबाबत गैरसमज व अफवा पसरू लागल्या आहेत. या उपक्रमाच्या अंमलबजावणीबाबत कोणतीही अफवा अथवा अडथळा निर्माण करू नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून महानगरपालिका प्रशासन श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी ॲनिमल बर्थ कंट्रोल-एबीसी हा उपक्रम राबवित आहे. या अंतर्गत पालिकेच्या सहकार्याने विविध प्राणी कल्याण संस्था भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करीत आहेत. दरम्यान, शैक्षणिक संस्था, रुग्णालये, बस थांबे आणि रेल्वे स्थानके आदी ठिकाणी भटक्या श्वानांच्या हल्ल्यात वाढ होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित ठिकाणांहून भटक्या श्वानांना नियोजित निवारा केंद्रात हलविण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच प्रशासनाला दिले. मात्र, या आदेशाबाबत प्राणीप्रेमींनी नाराजी व्यक्त केली असून अनेक ठिकाणी आंदोलनही झाले.

न्यायालयाचे आदेश महानगरपालिकेच्या पशूवैद्यकीय आरोग्य विभागाच्या वतीने अंमलात आणले जात आहेत. तत्पूर्वी, भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवणे आणि अनियंत्रित वाढ रोखण्याच्या उद्देशाने प्राणी जन्म नियंत्रण कार्यक्रम प्राधान्याने हाती घेण्यात आला आहे. या अंतर्गत, एकूण आठ प्राणी कल्याण संस्थांकडून भटक्या श्वानांचे निर्बिजीकरण आणि लसीकरण करण्यात येत. तसेच, एकूण तीन प्राणी कल्याण संस्था श्वानांचे त्यांच्या अधिवासाच्या ठिकाणीच रेबीजविरोधी लसीकरण करीत आहे. मात्र, श्वानांच्या लसीकरणासाठी आलेले स्वयंसेवक दिसताच त्यांना विरोध करण्यात येत असून त्यामुळे एबीसी उपक्रमाच्या अंमलबजावणीत अडथळा निर्माण होत आहे. संबंधित संस्थांकडून केवळ निर्बिजीकरण आणि लसीकरणाच्या उद्देशानेच भटक्या श्वानांना पकडण्यात येते, असे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले.

भटक्या श्वानांना कोणताही धोका निर्माण झालेला नाही. त्यामुळे त्यांना अन्न देणारे नागरिक आणि प्राणीप्रेमींनी संबंधित संस्थांच्या स्वयंसेवकांना सहकार्य करावे, असे आवाहन पालिकेने केले. भटक्या श्वानांसंदर्भात अधिक माहितीसाठी महानगरपालिकेच्या पशूवैद्यकीय आरोग्य विभागाशी मोबाइल क्रमांक ७५६४९७६६४९ वर संपर्क साधावा, असे पालिकेकडून सांगण्यात आले.