मुंबई : मुंबई महानगरपालिकेने वर्सोवा – दहिसर – भाईंदर सागरी किनारा मार्ग प्रकल्प हाती घेतला असून या प्रकल्पासाठी गोरेगाव आणि मालाडमधील १२४४ झाडे हटवावी लागणार आहेत. यापैकी २५४ झाडे कापावी, तर ९९० झाडे पुनर्रोपित करावी लागणार आहेत.

मुंबई महापालिकेने सागरी किनारा मार्गाचा उत्तर मुंबईतील भागाचे काम सुरू केले आहे. वर्सोवा – दहिसर आणि पुढे भाईंदरपर्यंत हा मार्ग जाणार आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच शासकीय जमीन हस्तांतरित करण्याची प्रक्रियाही सुरू आहे. किनारपट्टी नियमन क्षेत्राबाहेरील (NON CRZ) भागामध्ये प्रत्यक्षात कामेही सुरू झाली आहेत. मात्र या सागरी किनारा मार्गामध्ये गोरेगाव आणि मालाडमधील काही झाडे बाधित होणार आहेत. ही झाडे हटवण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाने वृक्षप्राधिकरणाकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यानुसार वृक्षप्राधिकरणाने सात दिवसांची जाहीर नोटीस दिली असून त्यावर नागरिकांकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत. नागरिकांच्या हरकती व सूचनांवर १७ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे.

वर्सोवा – दहिसर सागरी किनारा मार्ग मुंबई महापालिका उभारत आहे. हा मार्ग पुढे दहिसर – भाईंदर उन्नत मार्गालाही जोडण्यात येणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर नरिमन पॉईंट येथून थेट दहिसर – भाईंदरपर्यंत जाता येणार आहे. मुंबई किनारी रस्ता वर्सोवा – भाईंदर प्रकल्पामुळे पश्चिम उपनगरातील दहिसर, बोरिवली, कांदिवली, मालाड इत्यादी भागातील रहदारी कमी व प्रवास गतिशील होणार आहे. तसेच, प्रवास वेळ, इंधन खर्चात माेठी बचत होणार आहे. वाहतूक व्यवस्थापनात देखील सुधारणा होणार असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.

भूखंडही बाधित

वर्सोवा – दहिसर दरम्यान १७.५७ किमीचा मार्ग आहे. या प्रकल्पासाठी पश्चिम उपनगरातील एकूण ६० भूखंड आरक्षित करावे लागणार आहेत. त्याचबरोबर गोरेगावचा वीर सावरकर पुलही पाडावा लागणार आहे. त्यातच आता १२४४ झाडेही हटवावी लागणार असल्याची माहिती पुढे येत आहे.

१६ हजार कोटी रुपये खर्च

वर्सोवा – दहिसर दरम्यानचा सागरी किनारा मार्ग एकूण १७.५७ किमी लांबीचा असून याकरीता १६,६२१ कोटी रुपये खर्च अंदाजित आहे. या मार्गाचे सहा टप्पे असून बांगूर नगर – माईंडस्पेस मालाड या दुसऱ्या टप्प्यात गोरेगाव – मुलुंड जोड रस्त्याला ४.४६ किमी लांबीचा एक जोड (कनेक्टर) देण्यात येणार आहे. या संपूर्ण मार्गावर पूल, बोगदा, उन्नत मार्ग अशी गुंतागुंतीची रचना आहे. त्यामुळे भविष्यात हे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर मरीन ड्राईव्ह येथून सागरी किनारा मार्गावरून थेट दहिसर – भाईंदर पश्चिम तसेच मुलुंडपर्यंत जाता येणार आहे.

१) माईंडस्पेस मालाड – चारकोप या टप्प्यासाठी मालाडच्या एम. डी. पी. रोड येथील ८६० पैकी ११८ झाडे कापावी लागणार आहेत. तर ६९७ झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहेत.

२) बांगूर नगर – मालाड माईंडस्पेस या टप्प्यासाठी गोरेगावमधील १३६ झाडे कापावी लागणार आहेत. या ठिकाणी ७५२ झाडे आहेत. त्यापैकी २९३ झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहेत.

गोरेगाव – मालाडमध्ये एकूण झाडे – १६१२

झाडे कापावी लागणार – २५४

पुनर्रोपित करावी लागणार – ९९०

एकूण झाडे हटवावी लागणार – १२४४