मुंबई : भायखळा येथील उर्दू भाषा भवनचा प्रकल्प नुकताच शिवसेना (शिंदे) – भाजप महायुतीने रद्द केला असून या भवनच्या बांधकामासाठीचा ४ कोटी रुपये बांधकाम खर्च मुंबई महापालिकेने राज्य कौशल्य विकास विभागाकडून वसूल केला. तसेच ४४ लाख रुपयांचे प्रलंबित भाडे मिळाल्यानंतर उर्दू भाषा भवनची जागा औद्योगिक प्रशिक्षण केंद्रासाठी औपचारिकपणे दिली जाणार आहे. ही जागा उर्दू भाषा भवनऐवजी आयटीआयसाठी द्यावी याकरीता भाजपचा विशेष आग्रह होता. त्यामुळे या विषयाला राजकीय वळण प्राप्त झाले आहे.

भायखळा येथील उर्दू भवनची अर्धवट बांधकाम असलेली इमारत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या भूखंडावर उर्दू भवन उभारावे याकरीता तत्कालीन एकसंघ शिवसेनेच्या सत्ताकाळात मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार या जागेवर उर्दू भाषा भवनचे बांधकामही सुरू करण्यात आले होते. मात्र या प्रकरणी उच्च न्यायालयात याचिका दाखल असून या बांधकामाला स्थगिती देण्यात आली होती. या जागेवर उर्दू भाषा भवन उभारण्याचा प्रस्ताव रद्द करावा आणि या ठिकाणी नियमानुसार औद्योगिक प्रशिक्षण संस्था उभारण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक, पालिकेतील प्रवक्ते भालचंद्र शिरसाट यांनी पालिका आयुक्तांकडे केली होती. हे उर्दू भवन भायखळा परिसरात असून एकसंघ शिवसेनेचे यशवंत जाधव स्थायी समिती अध्यक्षपदी असताना हे भवन त्यांच्या मतदारसंघात उभारण्यात येणार होते. शिवसेनेची दोन शकले झाल्यानंतर यशवंत जाधव पती-पत्नी यांनी शिवसेनेत (शिंदे) प्रवेश केला. त्यातच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या (शिंदे) उमेदवार यशवंत जाधव यांच्या पत्नी यामिनी जाधव पराभूत झाल्या. त्यातच भाजपने उर्दू भाषा भवन रद्द करून जागा आयटीआयला देण्याची मागणी केल्यामुळे एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, उर्दू भाषा भवनचा प्रकल्प मुंबई महापालिकेने रद्द केला असला तरी ही जागा अद्याप आयटीआयसाठी हस्तांतरित करण्यात आली नव्हती. राज्य सरकारने या केंद्राचे काम थांबवले होते. मात्र ४० टक्के बांधकाम झाले होते. त्यामुळे आता मुंबई महापालिकेने कौशल्य विकास विभागाकडून बांधकाम खर्च वसूल केला असून प्रलंबित ४४ लाख रुपये भाडे मिळाल्यानंतर ही जागा आयटीआयसाठी हस्तांतरित केली जाईल, अशी माहिती पालिकेतील सूत्रांनी दिली.

उर्दू भाषिक अध्ययन केंद्राला स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध आहे. आणि या प्रकरणी स्थानिकांनी आग्रीपाडा आयटीआय. बचाव कृती समिती स्थापन केली आहे. युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कौशल्य विकासाचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची गरज आहे. भायखळा येथे महापालिकेच्या १२ उर्दू शाळा आहेत. त्यामुळे ही जागा आयटीआयला द्यावी अशी आमची आग्रही मागणी होती असे मत भालचंद्र शिरसाट यांनी व्यक्त केले आहे.