मुंबई : मानखुर्द येथील चिताकॅम्प परिसरातील ट्रॅम्बे पोलीस ठाण्यालगतच्या लाल मैदानासमोरील पालिकेच्या शहाजीराजे मनपा उर्दू शाळा संकुलात पंखा कोसळून एक विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. शाळेतील सभागृहात शनिवारी सकाळी योग सुरू असताना ही दुर्घटना घडली. संबंधित सभागृह धोकादायक स्थितीत असून त्याची दुरुस्ती झाली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. महापालिकेच्या शाळेत ही दुर्घटना घडल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे शाळेचा दर्जा आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रम व उपाययोजना करण्यात येतात. कोट्यवधी रुपये खर्चून पालिकेतर्फे शाळांची उभारणी केली जाते. महापालिकेमार्फत मिळणारे मोफत शिक्षण व अन्य सुविधा आदींमुळे अनेक पालक मुलांना या शाळांमध्ये पाठवतात. मात्र, सद्यस्थितीत अनेक शाळांची स्थिती दयनीय झाली आहे.

साधारण तीन ते चार वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून मानखुर्द येथील शहाजीराजे मनपा उर्दू शाळा संकुल ही शाळा बांधण्यात आली असून शाळेच्या तळमजल्यावरील सभागृहात गळती होत आहे. जून महिन्यात याच सभागृहात काही दिवस विद्यार्थ्यांचे वर्ग भरविण्यात येत होते. तसेच, या ठिकाणी सकाळी योगाचे वर्ग घेण्यात येतात. शनिवारी सकाळी योग सुरू असताना छतावरील पंखा पडला.

पंख्याचे पात इयत्ता आठवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या कपाळाला लागल्याने ती गंभीर जखमी झाली. उपचारासाठी तिला नजीकच्या शहाजीनगर चिताकॅम्प नर्सिंगहोममध्ये नेण्यात आले. मात्र, डॉक्टर उपलबध नसल्याने कंपाउंडरने मलमपट्टी केली आणि पालिकेच्या शीव रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला.

संबंधित शाळेतील काही वर्गखोल्यांच्या खिडक्याची तावदाने तुटली आहेत. त्यामुळेही विद्यार्थी जखमी होण्याचा धोका आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जलशुद्धीकरण यंत्र उपलब्ध आहे. मात्र ते नादुरुस्त आहे. शिवाय, स्वच्छतेसाठी नेमलेल्या संस्थेचे कर्मचारी शाळेतील मोकळा भाग स्वच्छ करतात. शाळेत शिपाई नसल्याने वर्गखोल्यांची झाडलोट विद्यार्थीच करीत असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

दुर्घटनेनंतर मुलीला महापालिकेच्या रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी उपचार करून तिला घरी पाठवले. तिच्या डोक्याला सात टाके पडले असून डॉक्टरांनी तिला दोन – तीन दिवस आराम करण्याचा सल्ला दिला आहे, अशी माहिती विद्यार्थिनीचे वडिल रणधीर दास यांनी दिली.

पंखा खिळखिळीत झाला होता. त्यामुळे तो पडला. हा अपघात झाल्यानंतर इलेक्ट्रीशियनला बोलावून पंख्याची दुरुस्ती करण्यात. शाळेतील हॉल धोकादायक नसून सुस्थितीत आहे. लवकरच शाळेच्या इमारतीचे नूतनीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती शाळेचे मुख्याध्यापक विजयसिंग उईके यांनी दिली.