मुंबई : पश्चिम उपनगरातील मालाड हा सर्वाधिक लोकसंख्येचा भाग म्हणून ओळखला जातो. मालाड पश्चिमेला लागून असलेल्या मालवणी परिसरातील अनधिकृत बांधकामे ही या परिसरातली मोठी समस्या आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जागेवर असलेल्या बहुमजली झोपड्या आणि कांदळवनात भराव टाकून जमीन तयार करून त्यावर घरे उभारण्याचे उद्याोग इथे सर्रास चालतात. गेली अनेक वर्षे उभ्या असलेल्या या अनधिकृत बांधकामांसाठी एखादी मोठी पुनर्वसन योजनाच आणावी लागणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मालाड मालवणी हा परिसर अनधिकृत बांधकामासाठी कुप्रसिद्ध आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हद्दीतील या जमिनीवर गेल्या काही वर्षात तीन चार मजली झोपड्या उभ्या राहू लागल्या आहेत. या बहुमजली झोपड्या अनधिकृत आहेत हे उघड सत्य आहे. मात्र त्यावर ना पालिका कारवाई करते, ना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कारवाई केली जाते. त्यामुळे गेल्या काही वर्षात या ठिकाणी बेसुमार अनधिकृत बांधकाम झालेले आहे. या अनधिकृत वस्त्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाणही खूप आहे. मतांचे राजकारण करीत या बांधकामाला नेहमीच पाठिंबा मिळत असतो. तसेच इथे कारवाई करायला गेल्यास त्याला स्थानिकांचा विरोधही तीव्र असतो.

हेही वाचा : आमचा प्रश्न – दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ : धारावी पुनर्विकासाचा मुद्दा सर्वात महत्त्वाचा

मालवणी अनधिकृत बांधकामांनी ग्रस्त

मालवणी विभागाची ही रचना खूप जुनी असून १९८६ पासून या ठिकाणी झोपड्या आहेत. प्रकल्पबाधितांना या जमिनीवर जागा देण्यात आल्या होत्या. पिचेस म्हणजेच आरेखन करून या जागा देण्यात आल्या होत्या. या जागांवर या झोपड्या उभ्या राहिल्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे त्याचे भाडेपावतीचे पुरावे आहेत. मात्र झोपड्यांवर गेल्या काही वर्षांत अनधिकृत मजले उभे राहिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या हद्दीतील जमिनीवर या झोपड्या असल्यामुळे अनधिकृत मजले हटवण्याचे अधिकार पालिकेला नाहीत. केवळ पदनिर्देशित अधिकारी त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या निदर्शनास आणू शकतात. मालवणीतील अनधिकृत बांधकामे एवढ्या मोठ्या प्रमाणावर फोफावली आहेत की त्यावर एकेक कारवाई करणे अवघड असून या संपूर्ण परिसराचे सर्वेक्षण करून धारावीप्रमाणे एखादी पुनर्विकास योजना आणणे आवश्यक आहे.

हेही वाचा : ‘नीट राज्यकारभार केला नाही तर राजालाही पायउतार व्हावं लागतं’, मोहन भागवतांचा इशारा कुणाकडे?

खारफुटीला मूठमाती

मालवणी परिसराला लागूनच पुढे मढचा परिसर सुरु होतो. या परिसरात मोठ्या प्रमाणावर खारफुटी आहेत. या कांदळवनात राडारोडा टाकून भराव घालून जमीन तयार करण्याचे काम केले जात आहे. कांदळवनांच्या सुरक्षेसाठी इथे प्रभावी यंत्रणा हवी अशीही येथील नागरिकांची मागणी आहे.

हेही वाचा : मुंबई : बेकायदेशीर बांधकामांना अभय नाही, घणसोलीतील चारमजली इमारत पाडण्याचे आदेश देताना उच्च न्यायालयाने केले स्पष्ट

राजकारण्यांशी हितसंबंध

मालाडमधील अनधिकृत बांधकामांमागे पालिका, जिल्हाधिकारी या दोन प्राधिकरणांचे अधिकारी, पोलीस, राजकारणी यांचे हितसंबंध गुंतलेले असल्यामुळे वर्षानुवर्षे प्रश्न असाच राहिला आहे. गेल्या काही वर्षात इथे म्हाडाने इमारती उभारल्या आहेत. त्यामुळे इथे अधिकृत रहिवाशांच्या वसाहती वाढू लागल्या आहेत. त्यांना या अनधिकृत बांधकामांचा त्रास सोसावा लागतो. कोणतेही प्राधिकरण यात लक्ष घालून ही समस्या सोडवण्यास पुढे येत नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai north lok sabha constituency malad malvani area illegal constructions mumbai print news css