मुंबई : बेस्ट बसगाड्यांचे वेळापत्रक कोलमडले असून बसगाड्या विलंबाने धावू लागल्या आहेत. परिणामी, दुपारी बसच्या प्रतीक्षेत थांब्यावर ताटकळणाऱ्या प्रवाशांना कडक उन्हाचा ताप सहन करावा लागत आहे. दादर येथील कोतवाल उद्यानाकडील बस मार्ग क्रमांक १७२, कुर्ला पश्चिमेकडील फिनिक्स मॉल येथील बस मार्ग क्रमांक ३०२, ३०३, ७ मर्यादितसह मुंबईतील बहुतेक थांब्यांवर प्रवाशांना बसची बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत आहे.

बेस्ट बस मार्ग क्रमांक ११५ दुपारच्या सुमारास विलंबाने धावत असून बहुसंख्य प्रवाशांना थांब्यावर खोळंबून राहावे लागते. बसगाडी आगारात उपलब्ध असूनही ती सोडण्यात येत नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.

मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकातून दररोज ११ लाख प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांना पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट स्थानकाकडे किंवा नरिमन पाइंट, मंत्रालय, विधान भवन, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान या ठिकाणी जाणे बेस्ट बस मार्ग क्रमांक ११५ सोयीस्कर पडते. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळच्या वेळी या बसमध्ये प्रचंड गर्दी होते. या बस पूर्ण क्षमतेने भरल्याने अनेक प्रवाशांना एक किंवा दोन बस सोडाव्या लागतात.

हेही वाचा – वृत्तपत्र स्वातंत्र्याचा वापर प्रतिष्ठेच्या अधिकाराचे उल्लंघन करण्यासाठी नको – उच्च न्यायालय

तसेच, आता दुपारच्या सुमारास या बसला प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. मात्र, प्रवाशांच्या मागणीनुसार बस फेऱ्या नसल्याने सीएसएमटी येथील आगारात शेकडो प्रवाशांना उन्हात सुमारे ३० मिनिटे रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. त्यामुळे प्रवासी कमालीचे संतप्त झाले आहेत.

बेस्ट बस मार्ग क्रमांक ए- ११५ सीएसएमटी – नरिमन पॉईंट दरम्यान धावते. या बसमधून चर्चगेट, मंत्रालय, विधान भवन येथे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक आहे. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून दुपारच्या सुमारास बस मार्ग क्रमांक ए – ११५ बसच्या फेऱ्यांमध्ये कपात झाल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबईत यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमान १६ एप्रिल रोजी होते. मात्र, या दिवशी भर दुपारी अनेक मुंबईकर या बसची वाट पाहात रांगेत ताटकळत उभे होते. सीएसएमटी येथे दोन दुमजली बस उभ्या असतानाही बस व्यवस्थापक बस सोडत नव्हते. त्यामुळे प्रवाशांचा रागाचा पारा चढला होता. संतप्त प्रवाशांनी बेस्ट कर्मचाऱ्यांकडे बस सोडण्याची मागणीही केली. त्यानंतर, बेस्ट बस मार्ग क्रमांक ११६ ची दुमजली बस मार्ग क्रमांक ११५ वर वळवण्यात आली. सुमारे ३० मिनिटे प्रतीक्षा केल्यानंतर प्रवाशांना बसमध्ये प्रवेश मिळाला.

थांबे शेडविना

सध्या मुंबईतील तापमानाचा पारा चढता असल्याने प्रवाशांना उन्हाचा दाह सहन करावा लागत आहे. बेस्ट बसची वाट पाहण्यासाठी बराच वेळ उभे राहावे लागते. मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरातील बहुतांश थांबे शेडविना आहेत. एका खांबाला बेस्ट बस मार्गाचे क्रमांकाची पाटी लावलेली असते. तसेच येथून बस फेरी होते. मात्र, या थांब्याला शेड नसल्याने प्रवाशांना उन्हात ताटकळत उभे राहावे लागते.

हेही वाचा – मुंबई : पुतण्याचा निष्काळजीपणा काकाच्या जीवावर बेतला

‘मागणीनुसार सेवा पुरवू’

दुपारच्या सुमारास बेस्टच्या दुमजली बसगाड्या चार्जिंगसाठी आगारात थांबविण्यात येतात. तसेच यावेळी बसची देखभाल-दुरूस्ती केली जाते. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळच्या तुलनेत दुपारी बसच्या फेऱ्या कमी असतात. बस आगारात बस उभ्या असल्या तरी काही वेळा कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलत असतात. त्यामुळे कर्मचारी उपलब्ध नसतात. मात्र, प्रवाशांच्या मागणीनुसार बसची सेवा पुरवण्याकडे लक्ष देण्यात येईल, असे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.