मुंबई : चलार्थपत्र मुद्रणालयाच्या (करन्सी नोट प्रेस) परीक्षेत तोतया उमेदवार बसविल्याप्रकरणी पवई पोलिसांनी आणखी दोघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. यात चलार्थपत्र मुद्रणालयातील एक कर्मचारी आणि त्याच्यावतीने परीक्षा देणाऱ्या तोतया उमेदवाराचा समावेश आहे. याप्रकरणी जुलै महिन्यात ७ जणांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून आणखी आरोपींना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

नाशिकमध्ये शासनाचे चलार्थपत्र मुद्रणालय असून २०२२-२३ मध्ये कनिष्ठ तंत्रज्ञाच्या (ज्युनियर टेक्निशियन) १३५ पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्याची लेखी परीक्षा पवई येथील आयटी पार्कमध्ये घेण्यात आली होती. मात्र या परीक्षेत तोतया उमेदवार (डमी) बसविण्यात आल्याचे निदर्शनास आले. जुलै महिन्यात नाशिकच्या उपनगर पोलिसांनी याप्रकरणी नालंदा (बिहार) येथील रवीरंजन कुमार, संदीप कुमार, शिशुपाल कुमार, आयुष राज, राजीब सिंह, संदीप कुमार आणि आशुतोष कुमार या ७ जणांविरोधात गुन्हे दाखल केले होते. त्यानंतर हा तपास पवई पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता.

तोतया उमेदवारासह दोघांवर गुन्हा

तोतया उमेदवारांनी परीक्षा दिल्याचा संशय असल्याने एजन्सीने मागील ५ वर्षांत नियुक्ती झालेल्या सर्व कर्मचाऱ्यांना कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार एक कर्मचारी सरवन कुमार याने आपली कागदपत्रे सादर केली. एजन्सीने परीक्षेच्या काळातील बायोमेट्रीक, कॅमेऱ्यातील चित्रण आणि उमेदवाराच्या अर्जावरील छायाचित्रांची पडताळणी केली. त्यावेळी सरवन कुमार याने परीक्षेत तोतया उमेदवार बसविल्याचे लक्षात आले. त्यानुसार पवई पोलिसांनी सरवन कुमार आणि तोतया उमेदवार दीपक कुमार या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची सखोल चोकशी सुरू आहे. आरोपीने १५ हजार रुपये देऊन परीक्षेला तोतया उमेदवार बसवला होता.

काय गुन्हे दाखल ?

परीक्षेत तोताय (डमी) उमेदवार बसवणे म्हणजे मूळ उमेदवाराऐवजी दुसऱ्या व्यक्तीने परीक्षा देणे. हा प्रकार गंभीर फसवणुकीचा गुन्हा समजला जातो. या प्रकरणात खरे उमेदवार आणि तोतया (डमी) उमेदवार यांनी मिळून ही फसवणूक केल्याने विविध कलमा्ंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींविरोधात खोट्या माहितीवरून किंवा चुकीचा बहाणा करून फायदा घेणे (कलम ३३६), स्वतःला दुसरा असल्याचे भासवणे किंवा दुसऱ्याच्या नावाने परीक्षा देणे (कलम ३३७), बनावट कागदपत्रे वापरून प्रवेशपत्र, ओळखपत्र तयार करणे (कलम ३३८), संगनमत करून कट रचणे (कलम ३१८), शासकीय परीक्षा तसेच नियुक्ती प्रक्रियेत फसवणूक (कलम ३५१) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.