मुंबई : अभिनेता सलमान खानला याच्या इमारतीत शिरलेल्या तरूणाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना ताजी असताना आता गुरूवारी आणखी एका मॉडेलला सलमानच्या घराजवळून पोलिसांनी ताब्यात घेतले. ही तरूणी सलमानच्या घरात शिरण्याच्या प्रयत्नात होती. तिच्याविरोधात बेकायदेशीररित्या खासगी मालमत्तेत शिरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून या तरूणीला नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली.

सुरक्षा रक्षक व पोलिसांची नजर चुकवून गुरूवारी ही तरूणी सलमानच्या इमारतीत शिरली होती. तरूणी पंचवीशीतील असून खार येथे राहते. ती व्यवसायाने मॉडेल असल्याचे पोलिसांनी सांगितले. या तरूणीविरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्थानिक पोलीस व गुन्हे शाखेने तिची चौकशी केली. तिचा कोणताही घातपाताचा हेतू नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर तिला नोटीस देऊन सोडण्यात आले. दोन दिवसांतील ही दुसरी घटना आहे.

सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये मंगळवारी अचानक एका तरूणाने प्रवेश केल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. आरोपी तरूण पोलिसांची नजर चुकवत मोटरगाडीच्या मागे लपला. त्यामुळे तरूणाला सलमान खानाच्या इमारतीत प्रवेश करण्यात यश आले. पण हा प्रकार तात्काळ पोलिसांच्या लक्षात आला. त्यांनी संशयीत तरूणाला ताब्यात घेतले. जितेंद्रकुमार सिंह असे आरोपी तरूणाचा असून तो छत्तीसगड येथील रहिवासी आहे. इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी काही तास आधी जितेंद्रकुमार सिंहला गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर फिरताना पोलिसांनी हटकले होते. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम ३२९ (१) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

धमक्या आणि गोळीबार

यापूर्वीही सलमानला ठार मारणयाच्या धमक्या आल्या आहेत. त्यात आरोपींनी खंडणीहीही मागणी केली आहे. याप्रकरणी वांद्रे येथून एका व्यक्तीला व झारखंड येथून एका एका २४ वर्षीय भाजी विक्रेत्याला वरळी पोलिसांनी अटक केली होती. दोघांनीही वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाच्या व्हॉट्स ॲप क्रमांकावर संदेश पाठवून कोट्यावधींच्या खंडणीची मागणी केली होती. पण गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी आरोपींची माहिती मिळवून त्यांना तात्काळ अटक केली होती. सलमानच्या सुरक्षेमध्ये पोलिसांनी वाढ केली आहे. यापूर्वी सलमानच्या घरी लॉरेन्स बिष्णोई टोळीने गोळीबार केला होता. त्याप्रकरणी गुन्हे शाखेने मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. तसेच सलमानच्या कुटुंबियांनाही धमकावल्याप्रकरणी एका तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सलमानच्या इमारतीत खासगी सुरक्षा रक्षकांसह पोलीससही तैनात करण्यात आले आहेत.