मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील बोरघाटात ताशी ५० किमी अशी वेगमर्यादा होती. आता त्यात वाढ करण्यात आली असून बोरघाटात ताशी ६० किमी अशी वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. या नवीन वेगमर्यादेची अंमलबजावणी दोन दिवसांपासून सुरु झाली आहे. मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्ग ९४ किमीचा असून या महामार्गावर प्रवास करताना हलक्या वाहनांना समतल भागात ताशी १०० किमी अशी वेगमर्यादा होती. तर ३५ ते ५२ किमीच्या बोरघाटात ताशी ५० किमी अशी वेगमर्यादा होती. अशावेळी समतल भागातून ताशी १०० किमी वेगाने येणाऱ्या वाहनांना बोरघाटात येताना ताशी ५० किमी वेग करणे अडचणींचे ठरत होते. त्यामुळे अपघातही होत होते.

हेही वाचा : Malegaon Blast Case : “२५ एप्रिलला हजर रहा, अन्यथा..”, न्यायालयाने प्रज्ञा सिंह ठाकूर यांना काय सांगितलं?

ही बाब लक्षात घेता पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्र यांनी एक प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार बोरघाटातील वेगमर्यादा बदलण्याची आवश्यकता व्यक्त केली होती. या प्रस्तावाच्या अनुषंगाने १५ एप्रिलला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी),परिवहन विभाग, पोलीस अधीक्षक, महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्र आणि इतर प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची एक बैठक झाली. या बैठकीत एकमताने बोरघाटातील वेगमर्यादा बदलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार आता महामार्गावर हलक्या वाहनांना समतल भागात ताशी १०० किमी तर बोरघाटात ताशी ६० किमी अशी वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे. मागील दोन दिवसांपासून ही नवीन वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे.