Mumbai Rain Updates Traffic Advisory : भारतीय हवामान विभागाने मंगळवारी (१९ ऑगस्ट) मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. शहर व उपनगरांमध्ये जोरदार पाऊस चालू असून अनेक सखल भागांमध्ये पाणी साचलं आहे. मुंबईतील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद आहेत. बऱ्याच रस्त्यांवर गुडघ्यापेक्षा जास्त पाणी साचल्याने त्या भागातील वाहतूक बंद आहे. मुंबईकरांची लाईफलाइन म्हणून ओळखली जाणारी लोकलसेवा देखील खोळंबली आहे. याच पार्श्वभूमीवर, मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

हवामान विभागाने मुंबईला रेड अलर्ट दिला असून या पार्श्वभूमीवर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राथिकरणाने मुंबई व उपनगरांमधील सर्व शासकीय व खासगी शाळांना आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच, मुंबई महापालिकेने मुंबईतील खासगी कंपन्यांना देखील महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. सर्व खासगी कार्यालये व आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरी राहून कामकाज (वर्क फ्रॉम होम) करण्याच्या सूचना द्याव्यात असं पालिकेने सांगितलं आहे.

किनाऱ्यांजवळ जाणं टाळा

मुंबई पोलिसांनी लोकांना सूचना केली आहे की “गरज नसल्यास घराबाहेर पडू नका. भरतीच्या वेळी किनाऱ्यांजवळ जाणं टाळा. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत आमच्याशी संपर्क करा. आम्ही तुमच्या आजूबाजूलाच आहोत हे विसरू नका. आम्ही खासगी कंपन्यांना विनंती केली आहे की शक्य असल्यास त्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना आज घरून काम करण्याची मुभा द्यावी.”

मुंबई वाहतूक पोलिसांकडून नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना

  • दादर टीटी, ट्रॉम्बे, महाराष्ट्र नगर सबवे , अँटॉप हील ,या ठिकाणी एम. जी. आर. चौक, कानेकर नगर, सरदार नगर, प्रतीक्षा नगर या भागात सकाळपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे दीड ते दोन फुटांपर्यंत पाणी साचल्याने वाहतूक संथ गतीने चालू आहे.
  • शेख मिस्त्री दर्गा रोडवर (वडाळा) पाणी साचल्यामुळे वाहतूक मंदावली आहे.
  • दादर टीटी गांधी मार्केट, वरळी नाका उत्तर वाहिनी, वांद्रे बँड स्टँड, जे.जे. मार्ग, हिंदमाता, माटुंगा किंग सर्कल, वाकोला राम नगर सबवे येथे पाणी साचले आहे. त्यामुळे या परिसरात जोडणाऱ्या मार्गिकांवरील वाहतूक संथ गतीने चालू आहे.
  • माटुंगा येथील गांधी मार्केट परिसरात दीड फूट पाणी साचले होते, हिंदमाता येथे वाहतूक संथ गतीने सुरू आहे. पायधुनी डीडी जंक्शन येथेही पाणी साचल्याचे पोलिसांनी सांगितले.
  • गोल देऊळ, गुलालवाडी, वडाळा, शिवडी, नवाब टँक, नागपाडा, मराठा मंदिर, भायखळा, भोईवाडा, वडाळा स्टेशन, चार रस्ता, हिंदमाता जंक्शन, माटुंगा भागात सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे दीड ते दोन फूट पाणी साचले आहे, ज्यामुळे वाहतूक मंद गतीने चालू आहे. या भागात वाहन घेऊन जाणं टाळा
  • मालाड सबवेमध्ये दोन फूट पाणी साचलं आहे. त्यामुळे एमटीएनएल जंक्शनमार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.
  • भोईवाड्यातील अनेक भागांमध्ये पाणी साचलं असल्यामुळे येथील वाहतूक मंदावली आहे.
  • मुंबईतील पावसाचा विमान वाहतूक क्षेत्राला देखील फटका बसला आहे. १०२ विमानं मुंबईत नियमित वेळेपेक्षा उशिराने उतरली आहेत. तर १५५ विमानांच्या उड्डाणास उशीर झाला आहे.
  • पश्चिम उपनगरातील अंधेरी बर्फीवाला रोड, डी .एन. रोड येथे एक फूट पाणी साचले आहे. वाकोला पुलावरील पानबाई स्कूल येथील जंक्शन परिसरात एक फूट पाणी साचले असून खार सब वे येथेही पाणी साचले आहे.
  • पाणी साचल्यामुळे अंधेरी सब वे बंद करण्यात आला असून तेथील वाहतूक इतर ठिकाणी वळवण्यात आली आहे.
  • पाणी साचल्याने आरे कार शेड रोडवर मरोळ युनिट क्रमांक १९ (दिंडोशी) कडे जाणारी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. याशिवाय पावसामुळे पश्चिम द्रुतगती मार्ग व पूर्व मुक्त मार्ग येथील वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.