मुंबई : यंदा पावसाळ्यात १ जून ते २० ऑगस्टदरम्यान मुंबईत एकूण ३८२४ मिमी पावसाची नोंद झाली. साधारण हंगामात मुंबईत ४४१३.४ मिमी पाऊस अपेक्षित असतो. त्यामुळे हंगामाची सरासरी गाठण्यासाठी आता केवळ ५८९.४ मिमी पाऊस आवश्यकता आहे.

यंदा मोसमी पाऊस लवकर दाखल झाला असला तरी जून आणि जुलै महिन्यांत फारसा पाऊस पडला नाही. प्रत्येक महिन्यात दोन – तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे सरासरी इतकी नोंद झाली. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत साधारण ७९२ मिमी पावसाची नोंद झाली. पावसाचे हे प्रमाण महिन्यातील सरासरीपेक्षा (५६६.४ मिमी) जास्त आहे. त्यामुळे यंदा ऑगस्ट महिन्यातील पावसाची नोंद सरासरीपेक्षा जवळपास २२५ मिमीने अधिक आहे. यंदाच्या हंगामात १ जूनपासून २० ऑगस्टदरम्यान ३८२४ मिमी पाऊस झाला आहे. मागच्या वर्षी याच कालावधीत सुमारे ३४०० मिमी पावसाची नोंद झाली होती. यामुळे यंदा पावसाची सरासरी मागील वर्षाच्या तुलनेत अधिक आहे. दरम्यान, मुंबईत गुरुवारपासून पावसाचा जोर ओसरणार आहे. काही भागात हलक्या ते मध्यम सरी बरसतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

जून, जुलैमध्ये तूट

मुंबईत जून आणि जुलैच्या सुरुवातीला पावसाने दडी मारली होती. त्यानंतर महिनाअखेरीस पावसाने हजेरी लावली. मात्र, हलका पाऊस पडत असल्याने आधीची तूट भरून काढण्यासाठी त्याचा विशेष उपयोग झाला नाही. त्यामुळे जून महिन्यात मुंबईत सरासरी इतकी पावसाची नोंद झाली नाही. त्यानंतर जुलै महिन्यातही सारखीच परिस्थिती होती. मात्र, शेवटच्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे सरासरी गाठता आली.

आठवडाभर हलक्या सरींची शक्यता

मुंबईत मागील चार दिवसांपासून पाऊस पडत आहे. पावसाचा जोर बुधवारी काहीसा कमी होता. दरम्यान, मुंबईत गुरुवारनंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, असाच अंदाज देण्यात आला आहे.

मे महिन्यातच सर्वाधिक

यंदा मे महिन्यातच मुंबईत पावसाने दमदार हजेरी लावली होती. मुंबईत १ ते ३१ मे या कालावधीत ८८१.६ मिमी पावसाची नोंद झाली. यंदा हवामानातील बदलांमुळे मुंबई आणि उपनगरांमध्ये मे महिन्यात नेहमीपेक्षा जास्त पडलेला वळवाचा पाऊस आणि त्यानंतर लवकरच दाखल झालेला मोसमी पाऊस यामुळे संपूर्ण मे महिन्यात ८८१.६ मिमी पावसाची नोंद झाली. मेमध्ये हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात ५०३.२ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रा ३७८.४ मिमी पावसाची नोंद झाली होती. तब्बल १०७ वर्षांनी यंदा मे महिन्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.