मुंबई : बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत वरळीतील ५५६ बीडीडीवासियांचे ५०० चौ. फुटाच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले आहे. आता बुधवारी नायगावमधील ८६४ बीडीडीवासियांना चावी वाटप केले जाणार आहे. मात्र ना.म.जोशी मार्ग बीडीडी चाळीतील रहिवाशांना मात्र ५०० चौ. फुटाच्या घरात राहायला जाण्यासाठी फेब्रुवारी २०२६ पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. ना.म.जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकासाअंतर्गत पहिल्या टप्प्यात १२६० घरांचे काम सुरु असून त्यातील ५५७ घरांचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण करून निवासी दाखला घेत फेब्रुवारीअखेरीस या घरांचा ताबा दिला जाणार आहे.

म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून वरळी, ना.म.जोशी मार्ग आणि नायगाव बीडीडी चाळींचा पुनर्विकास करण्यात येत आहे. हा पुनर्विकास राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पास वेग देत शक्य तितक्या लवकर रहिवाशांना हक्काच्या घराचा ताबा देण्याचे राज्य सरकारने म्हाडाला आदेश दिले आहेत. ना.म.जोशी मार्ग बीडीडी वसाहत ११ एकरावर वसलेली आहे. त्यात ३२ चाळी असून प्रत्येक चाळीत २५६० सदनिका आहेत. त्यानुसार पुनर्विकासाअंतर्गत २५६० रहिवाशांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे.

पहिल्या टप्प्यात १६ पुनर्वसित इमारतींचे काम सुरु आहे. त्यात १२६० घरांचा समावेश आहे. त्या १६ इमारतींपैकी तीन इमारतींचे बांधकाम अंतिम टप्प्यात आहे.त्यात ५५७ घरांचा समावेश आहे. घरांचे बांधकाम येत्या काही दिवसांत पूर्ण होणार असून त्यानंतर इमारतीतील अंतर्गत कामांना सुरुवात करण्यात येणार आहे. त्याचदरम्यान अग्निशमन दलाचे ना हरकत प्रमाणपत्र घेत फेब्रुवारीअखेरीस ५५७ घरांचा ताबा देण्याचे नियोजन असल्याची माहिती मुंबई मंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.

पहिल्या टप्प्यातील तीन इमारतींनंतर उर्वरित इमारतींचे काम पूर्ण करून उर्वरित ७०० घरांचा ताबा सप्टेंबर २०२६ मध्ये देण्याचे नियोजन असल्याचेही अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे नव्या वर्षात ना.म.जोशी मार्ग येथील १२६० रहिवाशांचे उत्तुंग इमारतीत राहण्यास जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. फेब्रुवारीत काही जणांना तर सप्टेंबरमध्ये काही जणांना घराचा ताबा मिळणार ही आनंदाची बाब आहे. मात्र आमच्या काही मागण्या असून त्या पूर्ण होताना दिसत नाही. एका घरामागे एक वाहन उभे करण्यासाठी जागेची मागणी आम्ही कित्येक महिन्यांपासून करत आहोत, मात्र या मागणीकडे राज्य सरकार आणि म्हाडा दुर्लक्ष करत आहे. इमारतींच्या बांधकामातही आम्हाला काही त्रुटी दिसत आहेत. त्यामुळे वाहनतळाच्या जागेसह बांधकामातील त्रुटी म्हाडाने दूर करुन द्याव्यात अशी मागणी यानिमित्ताने ना.म.जोशी मार्ग बीडीडी चाळ पुनर्विकास समितीचे अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी केली.