मुंबई : बेस्ट कामगार सेनेत शिवसेना (ठाकरे) पक्षाने मोठा खांदेपालट केला आहे. कामगार सेनेच्या अध्यक्षपदी विधानपरिषदेचे आमदार सचिन अहीर यांची नेमणूक करण्यात आली आहे. तर सरचिटणीसपदी नितीन नांदगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे बेस्टच्या पतपेढीच्या निवडणूकीनंतर बेस्ट कामगार सेना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

बेस्टच्या पतपेढीच्या निवडणूकीत सपाटून पराभव झाल्यानंतर बेस्ट कामगार सेनेत आता मोठा खांदेपालट करण्यात आलाआहे. यामध्ये अध्यक्षस्थानी विधानपरिषदेचे आमदार सचिन अहिर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अहिर हे भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस आहेत. तसेच त्यांना कामगार संघटना क्षेत्रातील चांगला अनुभव आहे. तर बेस्ट कामगार सेनेच्या सरचिटणीसपदी उपनेते नितीन नांदगावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नांदगावकर हे मनसेतून ठाकरेंच्या शिवसेनेत आलेले आहेत. बेस्ट कामगार सेनेत मोठा बदल केल्यामुळे बेस्टच्या पतपेढीच्या निवडणूकीच्या पराभवाची त्याला पार्श्वभूमी असल्याची चर्चा आहे. बेस्टच्या पतपेढीच्या निवडणूकीनंतर माजी अध्यक्ष सुहास सामंत यांनी संपूर्ण कार्यकारिणीसह राजीनामा दिला होता.

बेस्ट पतपेढीच्या निवडणूकीत एकही उमेदवार निवडून न आल्यामुळे शिवसेना (ठाकरे) प्रणित बेस्ट कामगार सेनेची प्रतिमा धुळीस मिळाली होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची संघटना आणि बेस्ट कामगार सेनेचे उमेदवार यांनी एकत्र येऊन तयार केलेल्या पॅनेलला बेस्टच्या कामगारांनी नाकारले. ठाकरे बंधू एकत्र येऊन निवडणूक लढवणार अशा घोषणा केल्यामुळे या निवडणूकीला खूपच महत्त्व आले होते. सगळ्या राजकीय पक्षांचे लक्ष या निवडणूकीकडे लागले होते. मात्र बेस्ट कामगार सेनेला आपला एकही उमदेवार निवडून आणता आला नाही. तर आमदार प्रसाद लाड यांच्या पॅनेलने बेस्टच्या पतपेढीच्या निवडणूकीच्यावेळी कामगार सेनेवर भ्रष्टाचाराचे जे आरोप केले त्यामुळे कामगार सेनेचे सगळेच पदाधिकारी वादात सापडले.

बेस्टच्या पतपेढीच्या निवडणूकीतील पराभवामुळे बेस्ट कामगार सेनेबरोबरच ठाकरे बंधू, त्यांची संभाव्य युती आणि शिवसेना (ठाकरे) पक्षावरही टीका करण्याची आयतीच संधी विरोधकांना मिळाली. या पराभवानंतर माजी अध्यक्ष सुहास सामंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. तसेच संपूर्ण कार्यकारिणीचाच राजीनामा दिला होता. सरचिटणीस पदी आमदार अजय चौधरी यांचे बंधू रंजन चौधरी हे होते. या राजीनाम्यानंतर जवळपास दीड महिन्याने बेस्ट कामगार सेनेत हा खांदेपालट झाला आहे.

बेस्ट कामगार सेनेत पदाधिकाऱ्यांमध्ये बदल केल्यामुळे आता येत्या काळात कामगार सेनेची सदस्य संख्या वाढवणे, बेस्ट कामगार सेनेची ताकद बेस्टमध्ये वाढवणे ही आव्हाने नव्या कार्यकारिणीसमोर उभी आहेत.