दापोली साई रिसॉर्टच्या जमिनीच्या आर्थिक व्यवहाराचा उल्लेख शिवसेना नेते अनिल परब यांनी चार वर्षांपूर्वी जुलै २०१८ मध्ये झालेल्या विधान परिषद निवडणुकीच्या शपथपत्रात केला होता. या रिसॉर्टच्या वीजजोडणीसाठी अर्ज करतानाच त्यांनी घरपट्टीही भरली होती. त्यामुळे हे रिसॉर्ट परब यांच्याच मालकीचे आहे, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिकेद्वारे केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> मुंबई : रिक्षा-टॅक्सी प्रवाशांच्या सवलती कागदावरच

साई रिसॉर्ट पाडण्याच्या आदेशाविरोधात रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली असून कारवाईला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. रिसॉर्टच्या मालकाला तातडीचा दिलासा देण्यास नकार देताना याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचे न्यायालयाने मान्य केले. त्यानुसार या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार आहे. याच याचिकेत सोमय्या यांनी हस्तक्षेप याचिका केली असून कदम यांच्या याचिकेला विरोध केला आहे. सोमय्या यांची याचिकाही कदम यांच्या याचिकेसह सोमवारी सुनावणीसाठी येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा >>> मुंबईत कचऱ्यापासून साकारली फ्लेमिंगोची प्रतिकृती

परब यांनी ही मालमत्ता मिळवण्यासाठी कदम यांच्याशी संगनमताने कागदपत्रे बनवून फसवणूक केल्याचा आरोप सोमय्या यांनी या याचिकेत केला आहे. परब यांनी विभास साठे यांच्याकडून रिसॉर्टसाठी एक कोटी रुपये देऊन जमीन विकत घेतली. त्याबाबतची नोंदही परब यांनी निवडणुकीसाठी मालमत्तेचा गोषवारा लिहिताना नमूद केल्याचा दावा सोमय्या यांनी याचिकेत केला. टाळेबंदीच्या म्हणजे २०२०-२१ या काळात परब यांनी महावितरणकडे रिसॉर्टच्या वीजजोडणीसाठी अर्ज केला होता. त्यांचा हा अर्ज ११ हजार रुपयांचे शुल्क जमा झाल्यावर महावितरणने मंजूर केला. हे पैसे परब यांच्या खात्यातून देण्यात आले होते. याशिवाय परब यांनी २०१९-२० आणि २०२०-२१ या वर्षांची रिसॉर्टच्या जागेची घरपट्टीही भरल्याचा दावाही सोमय्या यांनी केला आहे. हे रिसॉर्ट आपल्या मालकीचे नाही हा परब यांचा दावा आहे, तर त्यांनी या रिसॉर्टच्या वीजजोडणीसाठी अर्ज का केला ? असा प्रश्न सोमय्या यांनी याचिकेत उपस्थित केला आहे.

शेत जमिनीचे बिगर शेती जमिनीत रुपांतर केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर परब यांनी कदम यांना हे रिसॉर्ट विकल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे. परब यांनी केलेल्या फसवणुकीत कदम यांचाही सक्रिय सहभाग होता. तसेच कदम हे परब यांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai sai resort in dapoli is owned by anil parab mumbai print news amy
First published on: 24-09-2022 at 22:05 IST