मुंबई : देशातील दहशतवादाशी संबंधित दीर्घकाळ चाललेल्या खटल्यांपैकी एक असलेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्याचा निकाल राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्याअंतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने गुरुवारी (३१ जुलै) दिला. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात जणांची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली आहे. यानिमित्ताने मुंबई सत्र न्यायालयाच्या आवाराला छावणीचे स्वरूप आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी विशेष काळजी घेऊन पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. तसेच दंगल नियंत्रण पथकाचे जवानही तैनात होते.

मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्यासंबंधित सुनावणीला गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास सुरुवात झाली. तब्बल १७ वर्षांनंतर लागणाऱ्या निकालाकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. या निकालाच्या पार्श्वभूमीवर मुंबई सत्र न्यायालयाबाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. मोठ्या संख्येने पोलिसांबरोबर सुरक्षा यंत्रणांचे जवान तैनात होते. या खटल्यातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात जणांना चोख सुरक्षा व्यवस्थेत न्यायालयात नेण्यात आले आणि सुनावणी संपल्यानंतर बाहेर आणण्यात आले.

ही सुनावणी पूर्ण होऊन न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर या खटल्याशीसंबंधित व्यक्ती व वकील पत्रकारांशी संवाद साधत होते. तसेच प्रत्येक व्यक्तीची कसून तपासणी केल्यानंतरच न्यायालयात प्रवेश दिला जात होता. या सुरक्षेसंदर्भातील प्रक्रियेमुळे मुंबई सत्र न्यायालयात इतर खटल्यासंबंधित कामासाठी आलेल्या नागरिकांना व वकिलांना एका रांगेत न्यायालयात सोडण्यात आले. त्यामुळे न्यायालयाबाहेर सर्वसामान्य नागरिक व वकिलांच्या रांगा पाहायला मिळाल्या.

नेमके प्रकरण काय?

मालेगाव येथील मशिदीजवळ २९ सप्टेंबर २००८ रोजी मोटारसायकलमध्ये ठेवण्यात आलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन सहा जण ठार आणि १०० हून अधिक जखमी झाले होते. सुरुवातीला राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) या प्रकरणाचा तपास केला होता. त्यानंतर, प्रकरणाचा तपास सीबीआयकडे, नंतर एनआयएकडे वर्ग केला गेला. आता देशातील दहशतवादाशी संबंधित दीर्घकाळ चाललेल्या खटल्यांपैकी एक असलेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाशी संबंधित खटल्याचा निकाल राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) कायद्याअंतर्गत स्थापन विशेष न्यायालयाने दिला असून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, ले. कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह सात जणांची पुराव्याअभावी सुटका करण्यात आली आहे.