मुंबई : भाषेच्या नावाखाली दुकानदार आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांवर हल्ले, शिविगाळ करण्याच्या प्रसंगांमध्ये वाढ होत असून राजकीय फायद्यासाठी दुकानदारांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप व्यापारी संघटनेने केला आहे. फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने याप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. संघटनेने कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव न घेता आपली नाराजी व्यक्त केली आहे.
गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेचा मुद्दा महाराष्ट्रात विशेषत: मुंबईत गाजत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मराठी भाषेचा आग्रह धरला असून मराठीत न बोलणाऱ्या व्यापाऱ्यांविरोधात मारहाण केल्याच्या अनेक ध्वनि-चित्रफितीही फिरत असतात. दुकानदारांवर होणाऱ्या या हल्ल्याचा फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेल्फेअर असोसिएशनने विरोध केला आहे. व्यापारी संघटनेचे अध्यक्ष विरेन शाह यांनी याबाबत एक ध्वनिचित्रफित समाज माध्यांवर टाकली आहे. त्यात त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाचे नाव न घेता दुकानदारांवरील हल्ल्याचा निषेध केला आहे.
विरेन शाह यांनी आपल्या ध्वनिचित्रफितीत म्हटले आहे की, अलिकडे सोशल मीडिया आणि बातम्यांमधून अनेक धक्कादायक चित्रफिती समोर येत आहेत, काही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते भाषेवरून दुकानदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करीत आहेत. महाराष्ट्रात राहून, मुंबईत व्यवसाय करताना मराठी भाषा शिकणे आणि बोलणे गरजेचे आहे. ही आपली संस्कृती आहे आणि इथल्या भूमीचा आम्हाला आदर आहे. पण दुकानदारांना मारहाण करण्याचा, अपमान करण्याचा, धमकावण्याचा कुणालाही अधिकार नाही.
कोणताही पक्ष किंवा व्यक्ती कायदा हातात घेऊ शकत नाही. केवळ दुकानदार एखादी विशिष्ट भाषा बोलत नाहीत म्हणून त्यांच्यावर हल्ले करणे हा सरळ कायद्याचा भंग आहे आणि हे अत्यंत निषेधार्ह आहे, असे मत विरेन शाह यांनी व्यक्त केले.
भाषेच्या नावाखाली दुकानदारांवर हल्ला करणाऱ्यांचा तीव्र निषेध करतो, असेही शाह यांनी या ध्वनि-चित्रफितीत म्हटले आहे. दुकानदारांच्या मनात भीती निर्माण करण्याचे राजकारण थांबवावे. दुकानदारांना मारहाण करण्याच्या घटनांबाबत कायदा व सुव्यवस्था यंत्रणा अजूनही गप्प का ? ध्वनि-चित्रफितीत कार्यकर्ते मारहाण, शिवीगाळ, दमबाजी करताना दिसत असून, त्यावर पोलीस किंवा राज्य सरकारने अजूनही कारवाई का केली नाही, असा सवाल शाह यांनी केला.
भाषेच्या कारणावरून दुकानदारांना मारहाण झाल्यास या प्रकरणात तत्काळ स्वतःहून गुन्हे दाखल करून संबंधितांविरोधात कठोर कारवाई करावी, महाराष्ट्रात अशा प्रकारचे राजकारण खपवून घेतले जाणार नाही, असा संदेश हिंसाचार करणाऱ्यांना द्यावा आणि दुकानदार व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे संरक्षण करावे, अशी मागणी शाह यांनी समाजमाध्यमांद्वारे केली आहे.