मुंबई : भारत–जपानदरम्यान २०३० पर्यंत ५ लाख व्यावसायिकांची गतिशीलता निर्माण करण्याच्या महत्त्वाकांक्षी उद्दिष्टपूर्तीसाठी मुंबई विद्यापीठाच्या करिअर ट्रेनिंग अँड प्लेसमेंट सेल आणि अल्केश दिनेश मोदी इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शिअल मॅनेजमेंट स्टडीज यांच्यातर्फे ‘इंडिया – जपान टॅलेंट मोबिलिटी प्रोग्राम’चे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाद्वारे भारतीय विद्यार्थ्यांना जपानमधील प्रतिष्ठित उद्योगसंस्थांशी जोडण्यात येणार असून, हा उपक्रम तंत्रज्ञान, अभियंत्रिकी, व्यवस्थापन आणि नवोन्मेष या क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याला नवी चालना देणार आहे. मुंबई विद्यापीठात प्रथमच जपानी कंपन्यांचा संयुक्त विद्यार्थी – सहभाग कार्यक्रम पार पडणार आहे.
सेमीकंडक्टर्स, मेकॅनिकल इंजिनीअरिंग, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता/डेटा सायन्स, तसेच व्यवस्थापन या क्षेत्रांमध्ये उद्योग – विद्यापीठ सहकार्य वाढविणे आणि प्रतिभाविकास साधणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. या उपक्रमात जपान व त्यांच्या भारतातील नऊ अग्रगण्य कंपन्यांमधील २९ प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. यात जेटीबी कॉर्पोरेशन, एनईसी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सुझुकी आर. अँड डी. सेंटर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, ग्लोबल प्लॅन इंक, १३६ एलएलसी, डीएनपी प्लॅनिंग नेटवर्क कंपनी लिमिटेड, एआयजीओ कंपनी लिमिटेड, इन्फोब्रिज ग्रुप आणि मार्केट एक्ससेल डेटा मॅट्रिक्स प्रायव्हेट लिमिटेड यांचा समावेश आहे.
मुंबई विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागातील आणि सलंग्नित महाविद्यालयातील १५० विद्यार्थी सहभागी होत आहेत. यामध्ये अल्केश दिनेश मोदी इन्स्टिट्यूट ऑफ फायनान्शिअल मॅनेजमेंट स्टडीज्, जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, गरवारे इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, संगणकशास्त्र विभाग, भौतिकशास्त्र विभाग, नॅशनल सेंटर फॉर नॅनोसायन्स अँड नॅनोटेक्नॉलॉजी, माहिती तंत्रज्ञान विभाग, ठाणे उपपरिसर तसेच विद्यापीठाशी संलग्न निवडक महाविद्यालयांचा समावेश आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना कंपनी प्रतिनिधींसोबत रोजगार, इंटर्नशिप, कौशल्य विकास आणि संयुक्त संशोधनाच्या संधींबाबत थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. कलिना संकुलात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
