मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या चेंबूर येथील विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या शैक्षणिक संस्थेने तयार केलेली स्वदेशी बनावटीची चिप भारताच्या तांत्रिक आत्मनिर्भरतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरली आहे. नवी दिल्ली येथे आयोजित ‘सेमीकॉन इंडिया २०२५’मध्ये पंतप्रधानांना सादर केलेल्या एकात्मिक सर्किट चिप्सच्या ऐतिहासिक कोलाजमध्ये या संस्थेच्या चिपला स्थान मिळाले आहे. यामुळे देशाच्या सेमीकंडक्टर क्षेत्रात मुंबई विद्यापीठासह शैक्षणिक संस्थांचे योगदान अधोरेखित झाले आहे.
भारत सरकारच्या ‘चिप्स टू स्टार्टअप (सी२एस)’ कार्यक्रमांतर्गत विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्राध्यापकांच्या चमूने ही प्रोग्रामेबल गेन एम्पलीफायर (पीजीए) आयसी चिप यशस्वीरित्या डिझाइन केली आहे. ही चिप मोहाली येथील सेमीकंडक्टर लॅबोरेटरी (एससीएल) मध्ये १८० एनएम सीएमओएस तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात आली. या प्रकल्पाला भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ८२.५९ लाख रुपयांचे अनुदान मिळाले आहे.
सेमीकंडक्टर क्षेत्रातील या यशाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, इंडस्ट्री-एकेडेमिया श्रेणीमध्ये निवडले गेलेले विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी हे महाराष्ट्रातील एकमेव खासगी अभियांत्रिकी महाविद्यालय ठरले आहे. विशेष बाब म्हणजे उद्योग भागीदार म्हणून पनाश डिजिलाईफ ही कंपनी विवेकानंद एज्युकेशन सोसायटी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीद्वारे तयार केलेल्या या चिप्सचा वापर करून अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक उपकरणे तयार करणार आहे.
‘देशातील शिक्षण संस्था, विशेषतः मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालये, अत्याधुनिक संशोधन आणि नवनिर्मितीच्या माध्यमातून राष्ट्रीय विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत’, असे मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले.