मुंबई : फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे (एफआयसीसीआय) दिल्या जाणाऱ्या ११ व्या ‘फिक्की उच्च शिक्षण उत्कृष्टता पुरस्कार सोहळ्यात’ (एफआयसीसीआय हायर एज्युकेशन एक्सक्लेंस अवॉर्ड्स २०२५) मुंबई विद्यापीठाला केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘सर्वोत्तम संस्था’ (एक्सक्लेंस इन ग्लोबलायझेशन) हा मानाचा पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. हा पुरस्कार नवी दिल्ली येथील भारत मंडपम् येथे मुंबई विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. अजय भामरे आणि संशोधन व विकास कक्षाचे संचालक प्रा. फारुक काझी यांनी स्वीकारला.

मुंबई विद्यापीठाने ग्लोबलायझेशन उपक्रमांतर्गत सादर केलेल्या केस स्टडीजचे प्राथमिक परीक्षक मंडळ आणि अंतिम परीक्षक मंडळ अशा दोन टप्प्यात कठोर परीक्षण झाल्यानंतर मुंबई विद्यापीठाला सर्वोत्तम संस्था म्हणून निवडण्यात आले आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करूनत उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयीकरणात मुंबई विद्यापीठ आघाडीवर आहे.

दुहेरी, सह आणि ट्विनिंग पदवी अभ्यासक्रमांसह विविध शैक्षणिक उपक्रमांसाठी जागतिक स्तरावरील नामांकित विविध २३ उच्च शिक्षण संस्थांशी मुंबई विद्यापीठाचे करार आहेत. क्यूएस रँकिंग, संयुक्त संशोधन प्रकल्प, इरॅस्मस संशोधन अनुदान, फॅकल्टी एक्सचेंज प्रोग्राम, ग्लोबल लर्निंग सेंटरसह फॉरेन लैंग्वेज सेंटर, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक तज्ज्ञांच्या भेटी, स्टडी इन यूनिवर्सिटी ऑफ मुंबई प्रोग्राम, ५५ हून अधिक देशातील विविध परदेशी विद्यार्थी, कल्चरल एक्सचेंज प्रोग्राम, आंतरराष्ट्रीय परिषदांमधील प्राध्यापकांचा सहभाग यासह अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम मुंबई विद्यापीठातर्फे राबविण्यात येतात.

‘एक्सक्लेंस इन ग्लोबलायझेशन’ हा पुरस्कार मुंबई विद्यापीठाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, जागतिक दृष्टिकोन आणि नवोन्मेषी शैक्षणिक उपक्रमांच्या बांधिलकीचे प्रतीक आहे’, असे मत मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

‘फिक्की’ ही १९२७ साली स्थापन झालेली देशातील सर्वोच्च औद्योगिक संघटना असून, ती शिक्षण, उद्योग, संशोधन आणि धोरणनिर्मिती यामध्ये सक्रीय भूमिका बजावते. फिक्कीतर्फे शिक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर सहभाग वाढविणाऱ्या आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या माध्यमातून शैक्षणिक गुणवत्ता उंचावणाऱ्या संस्थांना गौरविण्यात येते. विद्यापीठामध्ये आंतरराष्ट्रीय व आंतरसांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यासाठी शाश्वत प्रणाली विकसित करणे, परदेशी विद्यापीठे आणि संस्थांशी भागीदारी व सामंजस्य करार करणे, विद्यार्थी आणि प्राध्यापक देवाणघेवाण कार्यक्रम आयोजित करणे, तसेच अभ्यासक्रमामध्ये जागतिक दृष्टिकोन व परदेशी तज्ज्ञांचा सहभाग वाढविणे या निकषांवर आधारित उच्च शिक्षण संस्थांचे फिक्कीतर्फे मूल्यमापन केले जाते.