मुंबई : मुंबई महापालिकेतर्फे पूर्व उपनगरातील मुलुंड येथे लवकरच एक पक्षीगृह उभारण्यात येणार असून त्यासाठी पालिका प्रशासनाने शुक्रवारी निविदा मागवल्या. मुलुंडच्या या नियोजित उद्यानात १८ दुर्मिळ प्रजातींसह २०६ प्रजातींचे पक्षी ठेवण्यात येणार असून या कामासाठी १६६ कोटी रुपये खर्च अंदाजित आहे.
मुलुंड (पश्चिम) येथील नाहूर गाव परिसरात सर्व सुविधांनी युक्त असे उद्यान तयार करण्यात येणार आहे. तसेच या उद्यानात पक्षीगृह तयार करण्यात येणार आहे. इमारत देखभाल विभागाने या कामासाठी निविदा मागवल्या आहेत. प्रस्तावित मुलुंड पक्षी उद्यान १७,९५८ चौरस मीटर भूखंडावर बांधण्यात येणार असून ते भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाचे उपकेंद्र असेल. हे काम पूर्ण होण्यास दोन वर्षाचा अवधी लागणार आहे.
या पक्षी उद्यानात आशियाई, आफ्रिकी, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका अशी पक्ष्यांची क्षेत्रवार विभागणी असणार आहे. प्रत्येक पक्ष्यांच्या प्रजातींचे निवासस्थान उभारण्यात येणार आहे. रेड ब्रेस्टेड पॅराकीट, ब्लॉसम हेडेड पॅराकीट, व्हाईट पीकॉक, मलबार ग्रे हॉर्नबिल, ब्लॅक हंस, ब्लॅक मुनिया, कोकाटू गालाह, ओस्ट्रिचेस, स्कॉलेट, स्कॉलेट, स्कॉलेट या काळाच्या ओघात लुप्त होत असलेल्या दुर्मिळ १८ प्रजातींचे २०६ पक्षी येथे पाहता येणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच मुलुंड पक्षी उद्यानाचे भूमिपूजन होईल. पक्षी उद्यानात जागतिक दर्जाची सुविधा निर्माण करण्यासाठी सिंगापूरच्या प्रसिद्ध जुरोंग बर्ड पार्कशी सहकार्य करण्याचा आमचा विचार आहे. सुमारे २५ लाख लोकसंख्या असलेल्या पूर्व उपनगरातील नागरिकांना तसेच नवी मुंबई आणि ठाण्यातील रहिवाशांना या बर्ड पार्कमुळे विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध होईल. हे एक प्रमुख पर्यटन आकर्षण म्हणूनही उदयास येईल, असे स्थानिक आमदार मिहिर कोटेचा यांनी सांगितले.
पक्षी उद्यानात प्रशस्त आणि नैसर्गिक निवारे असतील. पक्षांसाठी नैसर्गिक अधिवास तयार करण्यात येणार आहेत. पक्षीगृहात प्रवेश करण्यापूर्वी मोठ्या धबधब्यासह आणि प्रवाहासह पर्यटकांचे स्वागत करण्यासाठी खुले प्लाझा देखील असेल. या पक्षी उद्यानात संवादात्मक कार्यक्रम, कार्यशाळा आणि पक्षी तज्ज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातील, असे कोटेचा यांनी सांगितले.
ब्रिटिशांनी एका शतकापूर्वी मुंबईत भायखळा येथे पहिले प्राणीसंग्रहालय उभारले होते. त्यानंतर आता इतक्या वर्षांनी पूर्व उपनगरात पक्षीगृह उभारण्यात येत आहे.