लोकसभा निवडणुकीत मुलाचा झालेला दारुण पराभव.. पक्षात कोणतीही महत्त्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता दूरान्वयानेही नाही.. देशभरात काँग्रेसचे झालेले पानिपत.. या सर्व पाश्र्वभूमीवर पक्षात प्रचंड अस्वस्थ असलेले नारायण राणे काँग्रेसचा हात सोडून जाण्याच्या तयारीत असल्याची जोरदार चर्चा आहे. काँग्रेसमधून हकालपट्टी घडवून आणल्यास भाजपशी हातमिळवणी करण्याचा पर्याय राणे यांच्यासमोर असू शकतो. लोकसभेतील विजयानंतर राज्यातील काही मंत्री, नेते आमच्या संपर्कात असल्याचे भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी केलेले सूतोवाच या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.
पक्षात अस्वस्थ असल्याने येत्या दोन-तीन दिवसांत महत्त्वाची बातमी देईन, असे राणे यांनी विधानभवनात पत्रकारांशी अनौपचारिकपणे गप्पा मारताना सांगितले. आणि राणे यांच्या अस्वस्थेविषयी चर्चा सुरू झाली. लोकसभेतील पराभवानंतर राज्यात नेतृत्व बदल केल्यास आपली वर्णी लागावी, असा राणे यांचा प्रयत्न होता. पण पृथ्वी ‘राज’ च कायम राहणार असल्याचे स्पष्ट होताच राणे यांची अस्वस्थता आणखीनच वाढली. त्यातच मंत्रिमंडळातून वगळण्याची मुख्यमंत्र्यांची योजना असल्याचे कळल्यावर राणे अधिकच संतप्त झाले होते. पक्षात आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करून घेतला जात नाही, असे वक्तव्य राणे यांनी प्रचाराच्या काळात करून नेतृत्व बदल करायचे असल्यास विचार व्हावा, अशी भूमिका मांडली होती. काँग्रेसचे दिल्लीतील नेते राणे यांच्याकडे कोणतीही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यास राजी नाहीत. पक्षात अशीच कोंडी होणार असल्यास काँग्रेसमध्ये राहून काय साधणार, असा राणे यांना प्रश्न पडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हकालपट्टी घडवून आणणार?
* काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर सध्या विविध राज्यांतील अस्वस्थ किंवा नाराज नेते राहुल गांधी यांच्यावर खापर फोडू लागले आहेत.
* राहुल यांच्या विरोधात बोलणाऱ्या नेत्यांना लगेचच बाहेरचा रस्ता दाखविला जातो. राणेही हाच मार्ग पत्करतील व काँग्रेसमधून हकालपट्टी घडवून आणतील अशी शक्यता आहे.
* हकालपट्टी झाल्यानंतर राणे भाजपशीच हातमिळवणी करतील अशी अटकळ आहे. कारण त्यांच्यासाठी शिवसेनेचे दरवाजे बंद झाले आहेत.
* राष्ट्रवादीमध्ये काँग्रेसप्रमाणेच दुय्यम वागणूक मिळण्याची शक्यता आहे. मुलाच्या पराभवामुळे राणे यांच्या मनात राष्ट्रवादीबद्दल अढी आहे.
* राज ठाकरे यांच्याशी जुळवून घेणे कठीण आहे. शेवटी भाजपचाच पर्याय शिल्लक आहे. सध्या भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्रिपदावरून कुरघोडीचे राजकारण सुरू आहे.
*‘शत प्रतिशत भाजप’चे ध्येय साध्य करण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्यास भाजप आणि राणे या दोघांनाही ते उपयुक्त ठरेल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane may quit congress